अटक न करण्यासाठी लाच घेणारा सहाय्यक पोलीस फौजदार जाळ्यात
By विवेक भुसे | Published: December 20, 2023 10:38 PM2023-12-20T22:38:46+5:302023-12-20T22:38:55+5:30
राजेंद्र दगडू गवारे (वय ५३) असे या सहाय्यक पोलीस फौजदाराचे नाव
विवेक भुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: दाखलपात्र गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजारांची मागणी करुन १० हजार रुपये स्वीकारताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक पोलिस फौजदाराला रंगेहाथ पकडले. राजेंद्र दगडू गवारे (वय ५३) असे या सहायक पोलिस फौजदाराचे नाव असून, सध्या तो शिरूर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे.
शिरूरमधील ६५ वर्षाचे तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी गवारे याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. फिर्यादींनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती. त्याची बुधवारी पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्यास गवारे याने सहमती दर्शविली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, शिपाई प्रवीण तावरे, आशिष डावकर, हवालदार काकडे यांनी शिरुर तहसील कचेरी कार्यालयासमोरील हॉटेल मित्रधनमध्ये सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारताना गवारे याला पकडण्यात आले. शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर अधिक तपास करीत आहेत.