नागपुरात सहायक पोलीस उपनिरीक्षकेवर महिलेवर कुत्री सोडून हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 07:47 PM2019-11-21T19:47:52+5:302019-11-21T20:01:42+5:30
किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) महिलेवर शेजारच्या महिलेने कुत्रे सोडले. या कुत्र्यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक महिलेचे जागोजागी चावे घेऊन मांस तोडून काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) महिलेवर शेजारच्या महिलेने कुत्रे सोडले. या कुत्र्यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक महिलेचे जागोजागी चावे घेऊन मांस तोडून काढले. डिम्पल ऊर्फ शुभांगी राजेंद्र नायडू पवार असे जखमी एएसआयचे नाव आहे. विशेष म्हणजे, ज्या दाम्पत्याने आपल्या पाळीव कुत्र्यांकडून हा हल्ला करवून घेतला ते दाम्पत्य एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे. त्याचमुळे की काय, आपल्याच खात्यातील महिलापोलिसाची तक्रार नोंदवून घेताना पोलिसांनी कचखाऊ धोरण अवलंबिले आहे.
पोलीस दलच नव्हे तर उपराजधानीत चर्चेचे मोहोळ उडविणारे हे प्रकरण बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. न्यू मनीषनगरात नवनाथ सोसायटी असून, येथील तीर्थ पॅलेस अपार्टमेंटमध्ये एएसआय डिम्पल नायडू राहतात. त्या शहर पोलीस दलात, बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
ज्या तीन माळ्यांच्या इमारतीत त्या राहतात तेथे एकूण सहा सदनिका असून, तेथेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी रजत देशमुखही राहतात. त्यांनी व अन्य एकाने या इमारतीत मोबाईल टॉवर लावण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सहापैकी डिम्पलसह चार रहिवाशांनी त्याला विरोध केला. तेथून कुरबुरीला प्रारंभ झाला. त्यानंतर पुन्हा एका ओल्या पार्टीतील गोंधळाने या वादात भर टाकली. या पार्श्वभूमीवर, रविवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० ते ८.४५ च्या सुमारास डिम्पल कर्तव्यावरून परतल्या. त्यांनी आपल्या सदनिकेत जाऊन आपल्या एक वर्षीय बाळाला घेतले आणि त्याला फिरविण्याच्या उद्देशाने खाली आल्या. यावेळी खाली संजना देशमुख त्यांची तीन पाळीव कुत्री घेऊन होत्या. काय झाले कळायला मार्ग नाही, त्यांनी शूट गो ... म्हटले आणि तीनही कुत्री डिम्पल यांच्यावर झपटली. छोट्या बाळाला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डिम्पल यांना कुत्र्यांनी अक्षरश: लोळविलेच. पती राजेंद्र पवार यांनी डिम्पल यांच्या हातून बाळ घेतले. तोवर कुत्र्यांनी डिम्पल यांच्या हात, पाय, पोटरी, मांडी, कंबरेवर जागोजागी चावे घेतले.
अनेक ठिकाणी त्यांना ओरबडले तर काही ठिकाणी मांस काढले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. प्रकरण बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचले. ठाणेदार विजय तलवारे यांनी ज्यांच्या कुत्र्यांनी हा हल्ला केला, त्या देशमुख दाम्पत्यालाही बोलविले. रक्तबंबाळ अवस्थेत डिम्पलही ठाण्यात पोहचल्या. कुत्र्यांनी केलेला हा हल्ला ‘सहज किंवा आकस्मिक’ नव्हे, तो जाणीवपूर्वक करून घेण्यात आल्याचा (शूट गो) आरोप डिम्पल यांनी ठाण्यात तक्रार नोंदविताना केला. बरीच गरमागरमी झाली आणि नंतर या प्रकरणात कलम २८९, ३३८ अशी जुजबी कलमे लावली.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
डिम्पल मूळच्या गडचिरोलीतील रहिवासी आहेत. त्या आंतरराष्ट्रीय धावपटू असून त्यांनी अनेक सुवर्ण पदकं पटकावली आहेत. त्यांची ही कामगिरी बघता त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली आणि पदोन्नतीचेही मार्ग त्यांच्यासाठी मोकळे झाले. सध्या त्या शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. आपल्यावर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. आपल्या जखमा बोलक्या आहेत, असे असूनही आपल्याच ठाण्यातील मंडळी कचखाऊ धोरण राबवून आपल्यावर अन्याय करीत असल्याची त्यांची भावना झाली आहे. त्यांनी बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना भेटून आपली कैफियत ऐकवली. विशेष म्हणजे, ठाणेदार तलवारेंनी हे प्रकरण चौकशीसाठी एका नायक पोलीस कर्मचाºयाकडे (एनपीसी) सोपविले होते. पोलीस आयुक्तांनी त्यांना खडसावल्यानंतर प्रकरणाची चौकशी आता एपीआय राऊत यांना सोपविण्यात आली.