सहायक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:11 PM2021-01-30T12:11:53+5:302021-01-30T12:11:59+5:30
Bribe News राजेंद्र हरिभाऊ देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यासमाेरच चहाच्या टपरीवर शुक्रवारी सायंकाळी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जलंब : पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीची शिफारस करणे, तसेच ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारल्याने पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हरिभाऊ देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यासमाेरच चहाच्या टपरीवर शुक्रवारी सायंकाळी अटक केली.
जलंब पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या तीन नातेवाइकांविरुद्ध भादंविच्या ३७९(३४) अन्वये गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना पीसीआरऐवजी एमसीआर मिळण्यासाठी सहकार्य करणे, तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी सहाय्यक उपनिरीक्षक देशमुख याने केली. लाचेची रक्कम मागण्याची पडताळणी करण्यात आली. तसेच शुक्रवारी सापळा रचून पोलीस ठाण्यासमोरच्या चहा टपरीवरच सापळा लावण्यात आला. यावेळी आरोपी राजेंद्र हरिभाऊ देशमुख (रा.वाडी, लक्ष्मीनगर, खामगाव) याला अटक करण्यात आली.
ही कारवाई बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, अकोला पथकातील उपअधीक्षक एस. एस. मेमाने, पोना संतोष दहीहांडे, श्रीकृष्ण पळसपगार, इम्रान अली यांनी केली.