"छाती नाही हलत, मेला तो..."; वडिलांची हत्या करणाऱ्या आईचा खरा चेहरा मुलीनं जगासमोर आणला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:09 PM2022-11-16T18:09:08+5:302022-11-16T18:09:32+5:30
वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या स्वभावात बदल झाला. आरोपी मुकेश त्रिवेदीचं त्यांच्या घरी येणे जाणे वाढले
ब्रह्मपुरी - अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं संपवलं. मात्र आरोपी महिलेच्या मुलीनं आईच्या मोबाईलमधून ऑडिओ क्लिप बाहेर काढून या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली आहे. मुलीनं तिच्या वडिलांची हत्या करणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिला आणि प्रियकर दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील आंबेडकर चौकात आरोपी रंजना रामटेकेचं जनरल स्टोअर्स आहे. तर तिथेच मुकेश त्रिवेदी नावाचा इसम फळ आणि बांगड्या विक्रीचं दुकान चालवतो. त्रिवेदीचं रंजनाच्या घरी येणं जाणे असे. ६ ऑगस्ट २०२२ रोजी आई रंजनानं फोन करून मुलीला वडिलांचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगितले. मृत श्याम रामटेके हे वनविभागाचे निवृत्त कर्मचारी होते. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच दोन्ही मुली नागपूरहून चंद्रपूरला आल्या आणि अंत्यसंस्कार करून परत गेल्या.
वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या स्वभावात बदल झाला. आरोपी मुकेश त्रिवेदीचं त्यांच्या घरी येणे जाणे वाढले. समाजात बदनामी होत असल्याने मुलींनी आईला आणि त्रिवेदी यांना समजावले. आई एकटी राहत असल्याने छोटी मुलगी ब्रह्मपुरीला परत आली. घटनेच्या काही महिन्यांपूर्वी मुलीने आईला एक मोबाईल खरेदी करून दिला होता. छोट्या मुलीने अचानक आईचा मोबाईल बघताना कॉल रेकॉर्डिंग तपासलं तेव्हा तिच्यासमोर धक्कादायक रहस्य उघड झालं.
६ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे २.१४ वाजता जवळपास १०.५७ मिनिटे आई आणि मुकेश त्रिवेदीचं बोलणं झाल्याचं आढळलं. तिने रेकॉर्डिंग स्वत:च्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केली. रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा त्यात वडिलांचे हात बांधल्याचं, विष पाजल्याचं आणि तोंडावर उशी दाबल्याचा उल्लेख होता. त्रिवेदीनं सर्व ठीक करून सकाळी पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं सांग असंही रेकॉर्ड झाले. त्यानंतर मुलीने हे सगळं तिच्या मोठ्या बहिणीला सांगितले. मोठी बहीण ब्रह्मपुरीत आली आणि तिने पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर आरोपी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. रंजनाने आरोपी मुकेश त्रिवेदीसोबत मिळून पती श्याम रामटेकेंना विष पाजून त्यानंतर तोंडावर उशी दाबून ठार केले हे समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"