स्मशानभूमीत झाला राडा, दोन भावांवर हल्लेखोरांकडून तलवारीने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:44 PM2022-02-22T18:44:56+5:302022-02-22T18:46:02+5:30
Attack on Two Brother : नगरसेवक पाटील यांच्या अंत्यसंस्कार वेळी घडली घटना
सदानंद नाईक
उल्हासनगर : शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांच्या अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रसाद व बाबू (श्री) पाटील यांच्यावर शेकडो जणांच्या उपस्थितीत हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा भावावर फॉरटीज रुग्णालयात उपचार सुरू असून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उल्हासनगर कैलास कॉलनी परिसरातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आकाश पाटील या तरुण नगरसेवकांचे हुंदयविकाराने मृत्यू झाला. शेकडो जणांच्या उपस्थिती मंगळवारी दुपारी अड्डीच वाजता कॅम्प नं-५ येथील समतानगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारा नंतर नागरिक बाहेर पडत असतांना स्मशानभूमी प्रांगणात रिक्षातून आलेल्या एका हल्लेखोर टोळक्याने नगरसेवक आकाश पाटील यांच्या अंत्यसंस्कारात सामील झालेल्या प्रसाद पाटील व बाबू (श्री)पाटील या सख्या भावावर शेकडो जणांच्या समोर तलवारीने हल्ला केला. याप्रकारने अंत्यसंस्कारात सामील झालेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. काही नागरिकांनी हिंमत वठवून एका हल्लेखोराला पकडून हिललाईन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. तर इतर हल्लेखोर रिक्षा तिथेच टाकून पळून जाण्याचा यशस्वी झाले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद व बाबू पाटील यांना प्रथम बालाजी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पोटात वार झाल्याने, त्यांना डोंबिवली येथील फॉरटीज रुग्णालयात हलविण्यात आले.
नगरसेवक आकाश पाटील यांच्या अंत्यसंस्कार वेळी घडली घटना, उल्हासनगरात स्मशानभूमी प्रांगणात दोन भावावर हल्लेखोरांकडून तलवारीने हल्ला pic.twitter.com/t1hInUb6I6
— Lokmat (@lokmat) February 22, 2022
पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून हल्लेखोरांपैकी नागरिकांनी पकडलेल्या एका हल्लेखोराकडून माहिती घेण्यात येत आहे. अशी माहिती मोहिते यांनी दिली. तसेच हल्ल्यात जखमी झालेले सख्ये भाऊ असून हल्लेखोर कैलास कॉलनी जुने अंबरनाथ परिसरातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस अधिक तपास करीत असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. हल्ल्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यामध्ये तलवारी, चॉपर आदी घातक शस्त्र सापडल्याचे बोलले जात आहे. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोहिते यांनी दिली.