अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी कल्याणमधून केली अटक; तीन रिव्हॉल्व्हर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:22 AM2019-11-02T00:22:05+5:302019-11-02T00:22:21+5:30
टिटवाळा येथे राहणाºया लोहारियाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी कट्टा आणि सात जिवंत काडतुसे सापडली.
कल्याण : बाजारपेठ पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन रिव्हॉल्वर, ११ जिवंत काडतुसे, एक तलवार, दोन सुरे आणि दुचाकी असा एक लाख ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुरेश तेवर आणि प्रवीण लोहारिया अशी त्यांची नावे आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात एक व्यक्ती रिव्हॉल्व्हरसह दुचाकीवर फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन भोसले यांना मिळाली. त्यावरून घटनास्थळी पोलिसांचे पथक रवाना झाले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव सुरेश ऊ र्फ सुºया अयाकुट्टी तेवर असल्याचे उघड झाले. त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडली. त्याची अधिक चौकशी करता त्याच्याविरोधात तामिळनाडू राज्यात आणि मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तसेच त्याने त्याचा साथीदार प्रवीण लोहारिया नावाच्या साथीदाराकडे आणखीन रिव्हॉल्व्हर ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टिटवाळा येथे राहणाºया लोहारियाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी कट्टा आणि सात जिवंत काडतुसे सापडली.
टिटवाळा परिसरातच बनेली वस्तीवर सुरेश तेवर हा आश्रयाला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून संबंधित ठिकाणाची तपासणी केली असता त्याठिकाणी एक तलवार आणि दोन सुरे आढळले. या दोघांना अटक करून शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, या दोघांनी शस्त्रसाठा का बाळगला होता, मोठा घातपात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता का? याबाबतचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती कल्याण पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी दिली.