'सगळं माझ्यामुळे झालं...' मुलाच्या एनकाउंटरनंतर अतिक अहमदने पोलिसांकडे केली 'ही' विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:50 PM2023-04-13T18:50:17+5:302023-04-13T18:51:04+5:30
आज उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी असद अहमद एनकाउंटरमध्ये ठार झाला.
झाशी: आजचा दिवस उत्तर प्रदेशसाठी फार महत्वाचा दिवस ठरला आहे. राजू पाल हत्याकांडातील साक्षीतार उमेश पाल याच्या हत्येतील प्रमुख आरोपी आणि माफइया अतिक अहमदचा मुलगा असद अहमद एनकाउंटरमध्ये ठार झाला आहे. त्याच्यासोबत गुलाम नावाचा त्याचा साथीदारही ठार झाला आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. यावेळी आपल्या पापाची शिक्षा मुलाला भेटली, अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
आज योगायोगाची बाब म्हणजे झाशीच्या बडागाव पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या चकमकीत असद अहमद ठार झाला आणि त्याचवेळी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराज न्यायालयात हजर केले जात होते. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी आतिकला समजताच तो रडू लागला. काका अश्रफलाही मोठा धक्का बसला. जवळपास 40 दिवस फरार असलेला असद अखेर पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. अतिक मुलाच्या मृत्यूला स्वत:ला जबाबदार मानत आहे. दरम्यान, आता त्याने पोलिसांकडे मुलाच्या मातीत (अंतिम संस्कार) जाण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
यूपी पोलिसांना असदला जिवंत पकडायचे होते
असद आणि मोहम्मद गुलाम हे आज झाशीतील बारागाव ते चिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिचा धरणाच्या परिसरात लपले होते. यूपी एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांनी सांगितले की, असद आणि गुलाम यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी एसटीएफ टीमवर गोळीबार केला, त्यानंतर चकमकीत ते मारले गेले. 12 पोलिसांच्या पथकाने ही चकमक पार पाडली.
अशी झाली चकमक
असद आणि मोहम्मद गुलाम हे दोघे मोटरसायकलवरून जात होते. त्यामुळे पोलिस आणि यूपी स्टॅप टीमने दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान असद आणि मोहम्मद गुलाम यांनी पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी सुमारे 40 राऊंड गोळीबार करण्यात आला आणि असद आणि गुलाम हे दोन्ही शूटर ठार झाले. त्यांच्याकडून ब्रिटीश बुलडॉग रिव्हॉल्व्हर आणि वॉल्थर पिस्तूल सापडले आहे.