एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी घटनास्थळीच पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:14 IST2021-10-02T15:11:32+5:302021-10-02T15:14:31+5:30
Crime News : त्यांनी लगेच सदर पोलीसांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले.

एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी घटनास्थळीच पकडले
नागपूर : एटीएम फोडत असलेल्या एका त्रिकुटाला सदर पोलिसांनी घटनास्थळी रंगेहात पकडले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहन नगर आहे. या भागातील भीमसेन चौकातील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले जात असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना शुक्रवारी पहाटे तीन वाजता कळली.
त्यांनी लगेच सदर पोलीसांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणेदार विनोद चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. एटीएम मध्ये तीन आरोपी हातोडी,कटर आणि पेचकसच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम काढण्याच्या तयारीत पोलिसांना दिसले. पोलीस पथकाने त्यांना घटनास्थळीच जेरबंद केले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे स्वप्नील रामचंद्र जांभुळकर ( वय ४३, रा. खलाशी लाईन मोहन नगर), प्रवीण नामदेवराव लव्हाले ( वय ४३, रा. म्हाळगी नगर, हुडकेश्वर) आणि आकाश धर्मेंद्र नाईक (वय ४६, रा. खलाशी लाईन, सदर) असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडून कटर, मशीन, पेंचीस, चाकू, बॅग जप्त केली. त्यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाणे कलम ३७९,५११,४२७,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसाचा पीसीआर मिळविण्यात आला. पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
आरोपीचा ओव्हर कॉन्फिडन्स आरोपींनी एटीएम कसे फोडायचे आणि रक्कम कशी काढायची याबाबत बरेच दिवस अभ्यास केला. युट्युबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मोठी रक्कम हाती पडेल या विश्वासाने ते पहाटेच्या वेळी या एटीएममध्ये शिरले. मोठी रक्कम मशीन मध्ये असेल असा त्यांना विश्वास होता. ती नेण्यासाठी त्यांनी भली मोठी बॅगही सोबत घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यांना वेळीच जेरबंद करून त्यांचा डाव उधळला.