एटीएम कार्डची अदलाबदल करून फसविणारी टोळी गजाआड, महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गोव्यात फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:54 AM2021-03-14T03:54:06+5:302021-03-14T06:48:52+5:30

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोंगवली (जि. पुणे) येथील नीलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये मित्रासमवेत रोकड काढण्यासाठी गेले होते.

ATM card exchange fraud Gang arrested | एटीएम कार्डची अदलाबदल करून फसविणारी टोळी गजाआड, महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गोव्यात फसवणूक

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसविणारी टोळी गजाआड, महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गोव्यात फसवणूक

Next

 

शिरवळ (जि. सातारा) : एटीएम सेंटरमध्ये वृद्ध, महिलांना पैसे काढण्यात मदत करण्याचा बहाणा करीत एटीएमधारकाची वैयक्तिक माहिती घेऊन हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून परस्पर रक्कम काढून फसवणूक करणारी चार जणांची आंतरराज्य टोळी शिरवळ पोलिसांनी गजाआड केली. या टोळीकडून ६२ एटीएम कार्डसह गुन्ह्यात वापरलेली कार, ८ हजार १०० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. (ATM card exchange fraud Gang arrested)

प्रदीप साहेबराव पाटील (२९), किरण कचरू कोकणे (३५, दोघे रा. म्हारूळगाव, ता. कल्याण, जि. ठाणे), विकी राजू वानखेडे (२१, रा. भय्यासाहेब आंबेडकरनगर, उल्हासनगर), महेश पांडुरंग धनगर (३१, रा. ब्राह्मणपाडा, उल्हासनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोंगवली (जि. पुणे) येथील नीलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये मित्रासमवेत रोकड काढण्यासाठी गेले होते. सुर्वे रक्कम काढत असताना पाठीमागे असलेले दोघे जण हळूच व्यवहार पाहत होते. रक्कम न निघाल्याने पावती पाहत असताना संबंधितांनी एटीएममधील कार्ड हातचलाखीने बदलले. काही वेळानंतर नीलेश सुर्वे यांच्या मोबाइलवर संदेशाद्वारे शिरवळ येथील एका बँकेच्या एटीएममधून तसेच वेळे, आसले येथील पेट्रोलपंपावरून खात्यामधील तब्बल ५० हजार ८१० रुपये काढल्याचे निदर्शनास आले. सुर्वे यांनी तात्काळ शिरवळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दखल केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या पथकाने सीसीटीव्हींची पाहणी आणि गुन्हेगारांच्या चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करीत ही टोळी उल्हासनगर, ठाणे येथील असल्याचे ओळखले. या टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेता ते गोव्यावरून उल्हासनगरला कारमधून निघाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी सापळा रचून ही कार पाठलाग करीत अडवून चौघांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींनी शिरवळ पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांसह ठाणे ग्रामीण येथील पडघा, सोलापूर येथील सांगोला, अहमदनगर येथील राहुरी, पिंपरी-चिंचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमधील आठ गुन्ह्यांची कबुली दिली.

एका फेरीत लखपती
- ही टोळी २०१२ पासून कार्यरत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये २४ गुन्हे दाखल आहेत. 
- उल्हासनगरहून कारने निघाल्यानंतर विविध ठिकाणी फसवणूक व चोरी करत एका फेरीत ते लखपती होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

Web Title: ATM card exchange fraud Gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.