एटीएमजवळ सुरक्षा रक्षक न ठेवणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 07:28 PM2017-09-08T19:28:56+5:302017-09-08T19:28:56+5:30
गोव्यात एसबीआयचे एटीएम फोडून १८ लाख ३० हजार रुपये लंपास
पेडणे : आगरवाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरांनी उचकटून नेऊन फोडले आणि त्यातील १८ लाख ३० हजार रुपये लंपास केले. ही घटना शुक्रवार दि. ८ रोजी पेडणे पोलीस ठाण्याच्या कक्षेच्या घडली. या एटीएम मशीनकडे सुरक्षा रक्षक तैनात केला नव्हता.
आगरवाडा येथील मुख्य रस्त्यावर एसबीआयचे एटीएम आहे. हे मशीन केवळ दोन लोखंडी हुकवर फिक्स केले होते. चोरांनी लोखंडी सळीचा वापर करून हे मशीन हटवले. येथून काही अंतरावर असलेली रिक्षा चावी नसताना चोरांनी स्टार्ट केली व घटनास्थळी येऊन रिक्षात ते एटीएम मशीन घातले.
चोरांनी रिक्षातून हे मशीन माळरानावर नेले व भलेमोठे दगड घालून फोडले. त्यातील पैसे घेऊन रिक्षा मुख्य रस्त्यावर आणून ठेवली आणि ते आपल्या दुचाकीवरून पळून गेले. पोलिसाना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून चोर सापडण्याची शक्यता आहे.