एटीएम गॅस कटरने कापून १० लाख ५८ हजार लंपास, सहकारनगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:19 PM2019-04-29T23:19:00+5:302019-04-29T23:19:52+5:30
सहकारनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे स्वीच बंद करुन चोरट्यानी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १० लाख ५८ हजार २०० रुपयांची रोकड चोरुन नेली.
पुणे : सहकारनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे स्वीच बंद करुन चोरट्यानी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १० लाख ५८ हजार २०० रुपयांची रोकड चोरुन नेली. चोरट्यांनी जाताना एटीएमचे शटर खाली करुन गेल्याने दोन दिवसानंतर सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही बंद झाल्याने कोणतीही हालचाल एटीएममध्ये दिसत नसल्याने बँकेला हा प्रकार लक्षात आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहकार नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ही घटना २८ एप्रिलला दुपारी १२ ते २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान सहकारनगरमधील निर्मल पार्क येथील एटीएममध्ये घडली. याप्रकरणी बँकेचे अधिकारी चेतन दाभोलकर यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या एटीएममध्ये मागील दोन दिवसांपासून सीसीटीव्हीत काही हालचाल दिसत नव्हती़ त्यामुळे बँकेचे अधिकारी सोमवारी दुपारी तेथे दाखल झाले. त्यांनी पाहिले तेव्हा एटीएमचे शटर बंद होते. शटरवर करून त्यांनी आत प्रवेश केला आणि पाहिले तर समोर एटीएम मशीन चक्क गॅस कटरने कापलेली त्यांना दिसली. त्यांनी पाहणी केली तेव्हा त्यातील रोकडही गायब होती. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्याचे मेन स्विचही बंद होते. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान सीसीटिव्ही बंद असल्याने लुटतानाचे चित्रिकरण दिसले नाही. तर चोरट्यांनी रोकड लंपास केल्यानंतर शटर बंद करून ठेवले होते. त्यामुळे लोकांनाही ते तांत्रिक बिघाडामुळे बंद असेल असे वाटले होते. त्यामुळे कोणालाही ते समजले नाही. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, सहकारनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
गॅस कटरने एटीएम फोडण्याचे तीन गुन्हे
यापूर्वी चाकण जवळील खालुंब्रे गावातील बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून त्यातील १५ लाख रुपये लुटण्याची घटना ३१ मार्च २०१९ रोजी घडली होती. त्याच्याअगोदर भोसरी येथील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून त्यातील ३५ लाख रुपये चोरट्यांनी लांबविले होते़ ही घटना १६ मार्च २०१९ रोजी घडली होती.