ATS Action : टेरर फंडिंग प्रकरणात दाऊद गँगच्या परवेझला एटीएस ठोकल्या बेड्या
By मनीषा म्हात्रे | Published: August 4, 2022 07:08 PM2022-08-04T19:08:52+5:302022-08-04T19:09:45+5:30
ATS Action : अंधेरीतील राहत्या घरातून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : टेरर फंडिंग प्रकरणात डी गँगच्या परवेझ झुबेर वैद मेमन (४७) याला महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाला बेड्या ठोकल्या आहेत. अंधेरीतील राहत्या घरातून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दाउद इब्राहिम गँगचा हस्तक अनीस इब्राहिम व त्याचे साथीदार हे बेकायदेशीर कृत्यांमधून मिळालेला पैसा भारतात दहशतवादी कारवाया करण्याकरिता वापरत आहेत. याप्रकरणी एटीएसच्या काळाचौकी पोलीस २ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. याच टोळीमध्ये परवेझचाही सक्रीय सहभाग असल्याचे उघड होताच त्यालाही बुधवारी अंधेरीतून ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत तो अंमली पदार्थाचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ड्रग्ज तस्करी आणि अन्य गैरकृत्यातून मिळालेला पैसा भारतात दहशतवादी कृत्य घडवून आणण्याकरीता देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी संघटना व हस्तकांना पुरवित असल्याचे स्पष्ट होताच त्याच्यावर अटक कारवाई करण्यात आली आहे.
परवेझ हा बऱ्याच वर्षापासून डी गँगशी संबंधीत असून तो खंडणी इत्यादी बऱ्याच गुन्हयांमध्ये फरारी होता. त्यानंतर तो दुबई येथे पळून गेला. दुबईमध्ये राहून त्याने आपल्या गैरकायदेशीर व्यवसायाचा जम बसविला. तो सध्या अनिस इब्राहीम याचे सोबत देशविरोधी कटामध्ये सहभागी असून याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.