एटीएसची कारवाई; अवैध टेलिफोन एक्स्चेंजच्या म्होरक्याला हैदराबादमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:44 IST2019-09-06T13:41:33+5:302019-09-06T13:44:04+5:30
अद्ययावत उपकरणांचा वापर

एटीएसची कारवाई; अवैध टेलिफोन एक्स्चेंजच्या म्होरक्याला हैदराबादमधून अटक
मुंबई - अवैध टेलिफोन एक्स्चेंजच्या म्होरक्याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हैदराबादमधून बेड्या ठोकल्या. रफीक अन्सार बादशाह अल्लातूर असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईत वापर झालेले अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणेही एटीएसच्या हाती लागली आहेत.
अन्सार हा एटीएससोबतच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या २०१७ सालच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होता. एटीएसने ८ ऑगस्ट रोजी गोवंडीतील शिवाजीनगरसोबतच मुंबईतील मशीद बंदर, डोंगरी आणि वरळी तर, कल्याण आणि नवीन पनवेलमध्ये छापेमारी करून नाझीम खान (२९), फैजल बाटलीवाला उर्फ अकबर (४०), समीर दरवेज (३०), हुसैन सय्यद (३९), मंदार आचरेकर (३६), सिब्तेन मर्चंट (३३) आणि इम्तियाज शेख (३८) या सात जणांना बेड्या ठोकत, अवैध टेलिफोन एक्स्चेंजचे रॅकेट उद्ध्वस्त केले. त्यापाठोपाठ या टोळीच्या म्होरक्याला हैदराबाद येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ९ तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल कंपन्यांची एकूण दोन हजारांहून जास्त सिमकार्ड एटीएसने जप्त केली आहेत.आरोपींनी ही सिमकार्ड कशी व कोणाकडून मिळवली, याबाबत एटीएस अधिक तपास करीत आहेत. यात संबंधित सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का, यादृष्टीनेही एटीएस तपास करीत आहे.