'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या चौघांना परभणीतून ATSने घेतले ताब्यात
By राजन मगरुळकर | Published: September 22, 2022 05:02 PM2022-09-22T17:02:47+5:302022-09-22T17:12:59+5:30
पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान झाली कारवाई
परभणी: दहशतवाद विरोधी पथकाच्या नांदेड, औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने परभणीत गुरुवारी पहाटे कारवाई केली. यात चार जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईला पोलीस सुत्रांनी दुजोरा दिला. परभणी शहरात २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान ही कारवाई झाली. बुधवारी मध्यरात्री नांदेड, औरंगाबाद व परभणी एटीएसचे पथक शहरात कारवाईसाठी आले होते. त्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया शाखा परभणीच्या चार जणांना कारवाईसाठी ताब्यात घेतले.
चौघांपैकी नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तीन जण व अन्य एकास दुसऱ्या भागातून ताब्यात घेतले. त्यांच्यावर ठाणे येथील काळा चौकी पोलीस ठाणे येथे कलम १२१(अ ), १५३(अ), १२०(ब), १०९ भादवि, सहकलम १३(१) (ब) युएपीए अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई करण्यात आल्याचे समजते. ही कारवाई नांदेड एटीएसचे सपोनि. डि.एस.शिंदे, औरंगाबाद एटीएसचे सपोनि. देशमुख यांच्यासह औरंगाबाद पथकातील अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांनी केली. या कारवाईनंतर शहरात दिवसभर चर्चा एकावयास मिळाल्या. दरम्यान, या कारवाईबाबत स्थानिक पोलीस प्रशासन यांनी व एटीएस पथक नांदेड, ओरंगाबाद यांनी कमालीची गुप्तता पाळली.
नांदेडला न्यायालयात नेल्याची माहिती
या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या चार जणांना नांदेडच्या न्यायालयात गुरुवारी नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते. त्यानंतर पूढील प्रक्रीया केली जाणार आहे.