प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एटीएसची कारवाई; रेल्वे स्थानकावर दोन संशयितांना जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 09:42 PM2019-01-25T21:42:46+5:302019-01-25T21:44:06+5:30
पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त; सर्वत्र खळबळ
नागपूर : बिहारमधून आलेल्या दोन सशस्त्र संशयीतांना येथील रेल्वेस्थानक परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडे पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतूस सापडले. या दोघांकडे सांकेतिक शब्दातील (कोडवर्ड) एक चिठ्ठीही एटीएसच्या पथकाला मिळाल्याचे समजते. गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बिहार येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा घेऊन काही संशयीत नागपूररेल्वेस्थानकावर येत असल्याची माहिती गुरुवारी रात्री एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने मोजक्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवून अत्यंत सावधगिरीने रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावला. बिहारमधून येणा-या रेल्वेगाडी क्रमांक ०७०१० बरोनी सिकंदराबाद स्पेशल एक्स्प्रेसमधून गुरुवारी रात्री ८ च्या दरम्यान नमूद वर्णनाचे दोन व्यक्ती उतरले. रेल्वेस्थानकावर यावेळी प्रवाश्यांची मोठी गर्दी होती त्यामुळे गोंधळ उडू नये म्हणून एटीएसच्या पथकाने त्यांना रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या प्रिपेड ऑटो बूथजवळ गराडा घालून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि २० जीवंत काडतूस आढळले. एटीएसच्या पथकाला त्यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रात एक कोडवर्डमधील चिठ्ठीही मिळाल्याची माहिती आहे. त्यांना लगेच वाहनात घालून एटीएसच्या पथकाने अज्ञातस्थळी नेले. तेथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली.विशेष म्हणजे, या कारवाईची भनक प्रसारमाध्यमांना लागू नये यासाठी एटीएसच्या अधिका-यांनी विशेष काळजी घेतली. त्यांनी पत्रकारांचे फोन उचलणे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे बिहारमधून गडचिरोली-गोंदियातील नक्षलवाद्यांना ही अत्याधुनिक शस्त्रे पुरविणार होते, अशी माहिती आहे.
बिहार आणि यवतमाळ कनेक्शन
पकडण्यात आलेल्या दोघांची नावे कळू शकली नाही. मात्र, त्यातील एकाचे वय ४३ वर्षे असून तो वडगाव (यवतमाळ) येथील अशोकनगरातील रहिवासी आहे. तर, दुस-याचे वय ४९ वर्षे असून तो लक्ष्मीपूर पोस्ट नवागड, जि. मुंगेर (बिहार) येथील रहिवासी असल्याचे समजते.