दोनशे रुपयांवरून मित्रावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:44 AM2019-11-25T02:44:03+5:302019-11-25T02:44:14+5:30
दारू आणण्यासाठी दिलेले २०० रुपये मित्राने गहाळ करून त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोपरगाव परिसरात घडली.
डोंबिवली : दारू आणण्यासाठी दिलेले २०० रुपये मित्राने गहाळ करून त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोपरगाव परिसरात घडली.
पश्चिमेतील कोपरगाव परिसरात राहणारा अखिलेश जैस्वाल (२२) शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सचिन घनवट (रा. सिद्धार्थनगर) आणि त्याच्या अन्य तीन मित्रांसोबत याच परिसरात दारू पीत बसला होता. त्यावेळी दारू संपल्याने सचिनने त्याच्याजवळील २०० रुपये अखिलेशला दिले आणि आणखीन दारू आणण्यास सांगितले. थोड्या वेळाने दारू आणण्यासाठी गेलेल्या अखिलेशला खिशात पैसे नसल्याचे आढळून आले. म्हणून, परत आलेल्या अखिलेशने पैसे गहाळ झाल्याचे सांगत तुम्हाला पैसे मिळाले का, अशी विचारणा सचिनकडे केली. याचा राग आलेल्या सचिनने अखिलेशला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावेळी मित्र शंकर पाटील (रा. तेल्कोसवाडी) याने दिलेल्या धारदार शस्त्राने सचिनने अखिलेशवर हल्ला केला. त्यानंतर सचिनसह त्याचे मित्र पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या अखिलेशवर मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अखिलेशने विष्णूनगर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी सचिन आणि शंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.