अतिदक्षता विभागात दाखल न केल्याने परिचारिकेवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:55 AM2021-04-22T06:55:47+5:302021-04-22T06:55:56+5:30
काेराेनाबाधित पळाला; पाेलिसांनी घेेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे भीतीने काेराेनाबाधित रुग्णाने अतिदक्षता विभागात दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्याला दाखल न केल्याच्या रागात, त्याने परिचारिकेवर हल्ला करून पळ काढल्याची घटना एलिझाबेथ रुग्णालयातील कोविड केंद्रात घडली. पोलिसांनी रुग्णाचा शोध घेऊन त्याला वरळी कोविड सेंटरमध्ये दाखल केले.
परिचारिका किरकोळ जखमी झाली आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एन. एम. जोशी मार्ग परिसरात संबंधित रुग्ण राहण्यास आहे. १३ एप्रिलला त्याला एलिझाबेथ रुग्णालयातील कोरोना केंद्रात दाखल करण्यात आले होते. १५ एप्रिलला त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे त्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र परिचारिकेने तपासून अतिदक्षता विभागाची आवश्यकता नसल्याचे सांगितले. याच रागातून मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याने परिचारिकेवर चाकूहल्ला केला. तिला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टरांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथून पळ काढला.
एलिझाबेथ रुग्णालयाच्या काेराेना केंद्रातील घटना
एलिझाबेथ रुग्णालयाच्या काेराेना केंद्रात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाअंती रस्त्यावर फिरणाऱ्या या रुग्णाला ताब्यात घेऊन वरळीच्या कोविड सेंटरमध्ये हलवले. ताे कोरोनामुक्त झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल.