बोरिवली, काळबादेवी, डोंगरीत पोलिसांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 05:29 AM2023-03-02T05:29:10+5:302023-03-02T05:29:19+5:30

एकाची करंगळी फ्रॅक्चर, एकाला नेले फरफटत

Attack on police in Borivali, Kalbadevi, Dongri | बोरिवली, काळबादेवी, डोंगरीत पोलिसांवर हल्ला

बोरिवली, काळबादेवी, डोंगरीत पोलिसांवर हल्ला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांत पोलिसांवरील हल्ले वाढत असताना मंगळवारी डोंगरी, काळबादेवी, बोरिवलीत पोलिसांवर हल्ल्याच्या घटनांची भर पडली आहे. यामध्ये एका घटनेत पोलिसांची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत पोलिसाला दुचाकीचालकाने थेट फरफटत नेले आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे. 

पोलिस शिपाई सत्यवान सोनावणे हे वाडीबंदर जंक्शन येथील फ्री वेच्या उताराजवळ नाकाबंदीदरम्यान संशयित वाहनांची तपासणी करत असताना, सुजल नरसिम फुली (१९) हा विनाहेल्मेट ट्रिपल सीट जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला. मात्र, त्याने न थांबता पोलिसांना धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सोनावणे यांची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने सोनावणे याना जवळच्या रुग्णालयात नेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. आणि आरोपीला राहत्या घरातून डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. 

त्यापाठोपाठ, काळबादेवी वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार सुरेश श्रीरंग जाधव (५१) हे   यामलदास गांधी जंक्शन येथे कर्तव्य बजावत असताना, त्यांनी दुचाकी चालकाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र त्याने दुचाकी न थांबवता सुसाट जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी, दुचाकी चालकाला पकडताच दुचाकी चालकाने त्यांनाच काही अंतरावर फरफटत नेले. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत, अनाजे हरिशंकर वाल्मीकी (२४)  याला अटक केली आहे. तो कुलाबा येथील रहिवासी आहे. 

बोरिवलीत पोलिसांवर प्रहार 
बोरिवली पश्चिमच्या गणपत पाटीलनगर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद कार्यालयास प्रवीण तोगडिया हे भेट देणार असल्याने एमएसबी कॉलनी पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीचे नियंत्रण करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे पथक हे कर्तव्यावर होते. त्याच दरम्यान मारहाण आणि अन्य गुन्ह्यातील पसार आरोपी चिराग हा त्या परिसरात येणार असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. त्यानुसार ते एटीसी पथकासह त्याच्या मागावर गेले. आरोपी गल्ली नंबर १३ मध्ये त्या फिरत असताना त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी त्याने शिंदे यांच्या हातावर जड वस्तूने प्रहार केला.

Web Title: Attack on police in Borivali, Kalbadevi, Dongri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस