आरबीआयच्या अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीने हल्ला; शेजाऱ्यावर बोरिवलीत गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: October 23, 2023 04:39 PM2023-10-23T16:39:30+5:302023-10-23T16:39:52+5:30
बोरिवलीच्या गोराई परिसरात असलेल्या शक्तिधाम हाऊसिंग सोसायटीमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यावर काचेची बाटली फेकत त्यांना जखमी करण्याचा प्रकार बोरिवलीमध्ये शनिवारी घडला. त्या विरोधात या अधिकाऱ्याने बोरिवली पोलिसात धाव घेतल्यानंतर परमेश्वर लोहार (४०) नामक त्यांच्या शेजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अजित रहाटे (५६) हे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेमध्ये काम करतात. तर बोरिवलीच्या गोराई परिसरात असलेल्या शक्तिधाम हाऊसिंग सोसायटीमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ते २१ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मार्केटमधून फिरून आले आणि त्यांच्या घरासमोर दुचाकी पार्क करत होते. त्याच वेळी शेजारच्या खोलीत राहणाऱ्या लोहार यांनी त्याच्या टेरेसवरून रहाटेना शिवीगाळ करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर एका काचेच्या बाटलीत द्रवपदार्थ भरून ती बाटली रहाटेच्या दिशेने भिरकावली. ती बाटली त्यांच्या डोक्यावरून मोटरसायकलच्या पुढच्या टायरकडे पडली आणि ती फुटून त्यातील द्रव पदार्थ तसेच काचेचे तुकडे रहाटे यांच्या पायावर तसेच चेहऱ्यावर उडाले. ज्यात रहाटेच्या पायाची पोटरी, उजवी भुवई आणि डाव्या बाजूच्या ओठाला जखम झाली. ते पाहिल्यावर रहाटेचा मित्र विठ्ठल टेनिस यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करत या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर रहाटे उपचारासाठी कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात गेले व तिथून त्यांनी बोरिवली पोलिसात धाव घेतली. लोहार आणि रहाटे यांच्यात काही वाद आहेत आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरूनच हा प्रकार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी याप्रकरणी लोहारविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.