कुऱ्हाड ऑनलाइन मागवून कॉलेजमध्येच विद्यार्थ्यावर हल्ला; नेरुळमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 06:33 AM2024-03-02T06:33:46+5:302024-03-02T06:33:53+5:30

दोन विद्यार्थ्यांतील किरकोळ वादातून प्रकार

Attack on student in college by ordering ax online; Incidents in Nerul | कुऱ्हाड ऑनलाइन मागवून कॉलेजमध्येच विद्यार्थ्यावर हल्ला; नेरुळमधील घटना

कुऱ्हाड ऑनलाइन मागवून कॉलेजमध्येच विद्यार्थ्यावर हल्ला; नेरुळमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कॉलेजमध्येच कुऱ्हाडीने वार केल्याची घटना गुरुवारी घडली. जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून थोडक्यात त्याचे प्राण वाचले. कॉलेजमध्ये झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने बॅगमध्ये कुऱ्हाड आणली होती. हल्लेखोर विद्यार्थी अल्पवयीन आहे. त्याने ऑनलाइन कुऱ्हाड मागवली होती.  

नेरूळच्या एसआयईएस महाविद्यालयातील अकरावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या अकरावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. या वादातून गुरुवारी एक जण बॅगमध्ये छोटी कुऱ्हाड घेऊन आला होता. दोघांमध्ये पुन्हा वाद होताच एकाने त्याच्याकडील कुऱ्हाडीने दुसऱ्याच्या पाठीवर तसेच शरीरावर वार केले. या घटनेनंतर एकच धावपळ उडाली. हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याचे थोडक्यात प्राण वाचले असल्याचे नेरूळ पोलिसांनी सांगितले.  हल्ला करणारा विद्यार्थी रागीट स्वभावाचा असल्याची चर्चा महाविद्यालयात आहे. याप्रकरणी शुक्रवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

वर्गात पसरवला चिली स्प्रे
हल्ला करणाऱ्या मुलाने ऑनलाइन कुऱ्हाड मागवली होती. ती घेऊन तो कॉलेजला आला होता. गुरुवारी एका विषयाचे लेक्चर संपून दुसरे सुरू होत असताना वर्गात शिक्षिका नसताना त्याने संपूर्ण वर्गात चिली स्प्रे मारला. यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जळजळ झाली. त्याचवेळी त्याने समोर आलेल्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी इतर विद्यार्थी व शिक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.

घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. हल्ला करणारा विद्यार्थी ऑटिझमग्रस्त आहे. मानसिक संतुलन बिघडल्यानंतर त्याने हे कृत्य केले. त्याला शाळेतून काढण्यासाठी पालकांना कळवले आहे.
- डॉ. कोयल रॉयचौधरी, प्राचार्या, एसआयईएस महाविद्यालय

Web Title: Attack on student in college by ordering ax online; Incidents in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.