अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 04:20 PM2023-08-02T16:20:40+5:302023-08-02T16:21:05+5:30

या प्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

Attack on young woman by a rickshaw puller | अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला  

अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला  

googlenewsNext

मुंबई : आईला दवाखान्यात नेण्यासाठी गोवंडी रेल्वे स्थानकाकडे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या रिक्षाचालकाला ‘अंधा है क्या, हॉर्न बजाना’ असे बोलल्याने संतप्त रिक्षाचालकाने तिला थेट मारहाण सुरू केली. इतकेच नव्हे तर त्याच्या जोडीला असलेल्या त्रिकुटाने तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मात्र ती मदतीसाठी ओरडत असताना भीतीमुळे कोणीही पुढे आले नसल्याची धक्कादायक घटना गोवंडीत सोमवारी घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

गोवंडी परिसरात ३३ वर्षीय शबनम रजावुल्ला अन्सारी कुटुंबीयांसोबत राहते. सोमवारी आईची तब्येत बिघडल्याने तिने भावाला कॉल करून आईला दवाखान्यात नेण्याबाबत सांगितले. भाऊही सुट्टी घेऊन घरी येत होता. तोपर्यंत शबनम आईला घेऊन बाहेर पडली. दरम्यान, भावाने वाटेतच आईला बाइकवर सोबत घेत, शबनमला स्टेशनवरून येण्यास सांगितले. बैंगनवाडी सिग्नल जी एम लिंक रोड येथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पायी जात असताना, पाठीमागून येणाऱ्या रिक्षाचालकाने तिला ‘मरने का है क्या’ असे विचारले तेव्हा,  तिने त्याला हॉर्न बजाना, बोलताच त्याला राग आला. त्याने शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी हा रिक्षाचालक गुलजार फैयाज अली, महिला शिरीन आसिफ खान आणि अन्य एक अनोळखी महिला यांनी तिला बैंगणवाडी जंक्शन ते ट्रान्झिट कॅम्पपर्यंत ओढत नेले. तेथे तिला बेदम मारहाण केली. तिच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व आयफोनही हिसकावून घेतला. रिक्षाचालकाने तिच्या कपाळावर आणि नाकावर वार करत हत्येचाही प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच भावाने तिच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेत याबाबत देवनार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

तपास सुरू...
 तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत चालकाला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.
- राजेश केवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, देवनार पोलिस ठाणे

परिसरात गुंडगिरी...
वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यासाठी बहीण नेहमी येथील जवळील कब्रस्तानमध्ये जाऊन प्रार्थना करते. त्या दिवशीही आईला घेऊन मी पुढे गेल्यानंतर ती प्रार्थना करून दवाखान्यात येणार होते. बहिणीला खूप क्रूरतेने मारहाण केली आहे. ही एक टोळी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
- समीर अन्सारी, जखमी तरुणीचा भाऊ
 

Web Title: Attack on young woman by a rickshaw puller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.