माणगावमध्ये पोलिसांवर प्राणघातक हल्ला, आरोपींचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 02:54 AM2020-03-19T02:54:43+5:302020-03-19T02:57:50+5:30
सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे व चालक उद्धव टेकाळे हे दोघे माणगाव विभागीय गस्त करीत पहाटे २.३० वाजताच्या सुमारास इंदापूर येथे आले असता दोघांनी त्यांच्याकडील मॅक्सिमो वाहनाचा इको गाडीशी किरकोळ अपघात झाला आहे. या का
माणगाव : तालुक्यातील इंदापूर येथील पाणसई व वाढवण गावाच्या हद्दीमध्ये माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे आणि पोलीस गाडीचे चालक उद्धव टेकाळे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले असून, दोघांच्याही हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. जखमी पोलिसांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवार, १८ मार्च रोजी पहाटे ३ वा.च्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला.
सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे व चालक उद्धव टेकाळे हे दोघे माणगाव विभागीय गस्त करीत पहाटे २.३० वाजताच्या सुमारास इंदापूर येथे आले असता दोघांनी त्यांच्याकडील मॅक्सिमो वाहनाचा इको गाडीशी किरकोळ अपघात झाला आहे. या कारणावरून काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करून त्यांचे वाहन घेऊन वाढवण गावाकडे गेले आहेत, अशी माहिती दिली. त्यामुळे तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे, वाहनचालक उद्धव टेकाळे हे तातडीने वाढवण गावाच्या दिशेने गेले. ज्या ठिकाणी मॅक्सिमो वाहन घेऊन गेले होते. त्या घरासमोर जाऊन आवाज दिला. त्या घरातून तीन पुरुष व एक महिला बाहेर आली. त्यानंतर या दोन पोलिसांशी वाद सुरू झाला आणि काही कळण्याच्या आत पोलीस व त्यांच्यामध्ये झटापट झाली. या झटापटीत सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे यांच्या पायावर जोरदार प्रहार करून त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईचा मारा करून जखमी केले. या चकमकीत वाहनचालक उद्धव टेकाळे यांच्यावरसुद्धा प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या डाव्या पायावर जोरदारपणे फावड्याचा प्रहार केल्याने मोठी जखम झाली असून, त्यांच्या पायावर टाके पडले आहेत.
अशा बिकट परिस्थितीत सागर कावळे यांना चालता येत नव्हते, तरीही जीव एकवटून जखमी अवस्थेत पोलीस गाडी जवळ पोहोचले. त्यांनी वायरलेस यंत्रणेवरून या प्राणघातक हल्ल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांना दिली. दरम्यान, या हल्ल्यापूर्वी आम्ही इंदापूर जवळील वाढवण येथे अपघाताची माहिती घेण्यास जात आहोत, असे सांगितले होते. दरम्यान हे हल्लेखोर पसार झाले होते. या झटापटीत हल्लेखोरांकडील एक मोबाइल तपासात सापडला आहे. पसार झालेले आरोपी लवकरच सापडतील, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकीरण काशीद यांनी व्यक्त केला.
संपूर्ण माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. माणगाव पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाल्याने भीतीचे वातावरण पसरलेले आहे. गस्त घालताना अधिकाऱ्यांकडे स्वरक्षणासाठी बंदूक नव्हती. रायगड जिल्हा अधीक्षकांनी जखमींची भेट घेऊन चौकशी केली असून, कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी शशिकीरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. रामदास इंगवले व महिला उपनिरीक्षक प्रियांका बुरुंगळे करीत आहेत.