प्रेयसीसह तिच्या मुलावर चाकूहल्ला; प्रियकराला गोरेगावमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:06 AM2019-06-23T04:06:28+5:302019-06-23T04:07:42+5:30
फोन उचलला नाही, या रागात प्रियकराने प्रेयसीसह तिच्या पाच वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केला.
मुंबई - फोन उचलला नाही, या रागात प्रियकराने प्रेयसीसह तिच्या पाच वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ हल्लेखोराला अवघ्या काही तासांत वनराई पोलिसांनी अटक केली. देवेंद्र वाघेला असे हल्लेखोराचे नाव आहे. तो मीरा रोडच्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो.
त्याचे सुनीता विनायक जाधव नामक विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले होते. जाधवला पाच वर्षांचा मुलगा आहे़ चार वर्षांपूर्वी पतीसोबत पटत नसल्याने ती त्याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर, वाघेलासोबत तिची मैत्री झाली़ मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
जाधव सतत फोनवर बोलत असायची, ही बाब वाघेलाला खटकायची. त्याने कधीही फोन केला की, तिचा नंबर व्यस्त असायचा. त्याच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण झाला होता. शुक्रवारी जाधव गोरेगाव पूर्वच्या सोनावाला रोड परिसरातून तिच्या मुलाला घरी घेऊन निघाली होती.
त्यावेळी वाघेला त्या ठिकाणी आला आणि त्यांच्यात फोनवरून वाद सुरू झाले. तेव्हा वाघेलाने सोबत आणलेल्या चाकूने जाधववर वार केले. घाबरलेल्या मुलाने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला़, तेव्हा तोदेखील या हल्ल्यात जखमी झाला. दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात सोडून वाघेला फरार झाला. याबाबत वनराई पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले़ वाघेलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. काही तासांतच त्यांनी वाघेलाला अटक केली. सुनीताच्या पाठीवर चार वार असून तिच्या मुलालादेखील दुखापत झाली आहे.