रत्नागिरीत महिलेवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:10 AM2019-08-30T00:10:30+5:302019-08-30T00:10:35+5:30
रत्नागिरी - शहराजवळ टीआरपी येथे एका विवाहितेवर कोयत्याने प्राणघातक वार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वार झालेली विवाहिता ३० ...
रत्नागिरी - शहराजवळ टीआरपी येथे एका विवाहितेवर कोयत्याने प्राणघातक वार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वार झालेली विवाहिता ३० वर्षीय असून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने हल्ला करणाऱ्याचे नाव पोलिसांना सांगितले असून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
या हल्ल्यामध्ये डोके, हात, मान, पोटावर वार झाल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने विवाहितेवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु हल्ला करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे.
गुरुवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास टीआरपी येथील अविष्कार शाळेजवळून ही महिला पावसकर कॉलनी येथे जात असताना मागून आलेल्या तरुणाने कोयत्याने विवाहितेवर सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात तेथेच खाली पडली. त्यानंतर स्थानिकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. विवाहितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नाचणकर चाळ येथील पप्पू शंकर कट्टेमणी या तरुणाने हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र महिलेकडून पोलिसांना सध्या हीच माहिती उपलब्ध झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपीचा शोध घेत होते. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.