डॉक्टरला मारहाण करुन दवाखान्यात तोडफोड; मुलासह नातलगावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 08:28 PM2019-09-06T20:28:26+5:302019-09-06T20:43:23+5:30
उपचारासाठी येण्यास नकार व वडिलांचे मृत्यु प्रमाणपत्र न दिल्याने डॉक्टरला मारहाण
मीरारोड - वडिलांची स्थिती गंभीर असताना उपचारास येण्यास तसेच वडिलांच्या मृत्युनंतर दाखला देण्यास नकार दिल्याचा राग धरुन मुलाने त्या डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन तोडफोड केली. तसेच डॉक्टरला मारहाण केल्याची घटना मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे.
मीरारोडच्या वाघड नगर, लिबर्टी कॉर्नर येथे डॉ. निलेश डाहुले (३७) यांचा श्री बालाजी नावाने दवाखाना आहे. योगेश मिश्रा व कुटुंबियांचे डॉ. डाहुले हे सुमारे ८ वर्षांपासून कौटुंबिक डॉक्टर आहेत. योगेश यांचे वडिल शिवशंकर हे ८० वर्षांचे असून त्यांच्यावर डॉ. डाहुले हेच उपचार करत होते. २ सप्टेंबर रोजी योगेश यांनी डॉ. डाहुले यांना फोन करुन वडिलांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले. त्यावर डॉ. डाहुले यांनी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्ला.
काही वेळाने योगेशने पुन्हा फोन करुन रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येईपर्यंत एकदा तपासून बघा अशी विनवणी केली असता डॉ. डाहुले यांनी आपल्या मुलास ताप असल्याचे सांगून असमर्थता व्यक्त केली. परंतु, सकाळी डॉ. डाहुलेंना शिवशंकर यांचे निधन झाल्याचे समजले. योगेशने मृत्यु प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती. परंतु, मंगळवारी रात्री योगेश हा एका परिचीतासोबत डॉ. डाहुले यांच्या दवाखान्यात गेला व तेथे त्याने डॉ. डाहुलेंना मोठठ्या आवाजात दरडावर मारहाण केली. त्यांच्या टेबलावरील सामान फेकून देत केबीनची काच फोडली. या प्रकरणी डॉक्टरांच्या संघटनेने बुधवारी मीरारोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारायांची भेट घेतली व कारवाईची मागणी केली. तर डॉ. डाहुलेंच्या फिर्यादीवरुन योगेश व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.