गुन्हे करुन ओळख लपवून बसलेला अट्टल चोरटा एलसीबीच्या गळाला
By निलेश जोशी | Published: March 24, 2023 03:55 PM2023-03-24T15:55:23+5:302023-03-24T15:55:41+5:30
घरफोडी करण्यात होता पटाईत : आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु
बुलढाणा : घरफोडी करुन लाखोचा मुद्देमाल लंपास करुन राज्यासह इतर राज्यात स्वत:ची ओळख लपवून बसणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई २४ मार्च रोजी करण्यात आली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर त्याच्या इतर साथीदारांचा आता शोध सुरु आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात पाहीजेत, फरारी असलेल्या गुंडाचा शोध सुरु आहे. अशातच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये रात्रीदरम्यान घरफोडीच्या पाच गुन्ह्यातील फरार असलेला सै.शकील सै.युसूफ (जवाहर नगर बुलढाणा) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ मार्च रोजी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशन अंतर्गंत तीन घरफोड्या, मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गंत एक घरफोडी, शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक घरफोडी सोबतच बोराखेडी आणि बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गंत प्रत्येक एका घरफोडीची कबुली दिली. पथकाने सै.शकील सै.युसूफ यास शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली असून, त्याचाकडील गुन्ह्यात वापरलेली स्कुटी,घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. तर त्याच्या इतर साथीदारांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना झाली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, रामविजय राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल शदर गिरी,राजकुमारसिंग राजपूत, दिपक लेकुरवाळे यांनी केली.
आंध्र प्रदेशापासून दिल्लीपर्यंत तो फिरत असे सहज
अटक करण्यात आलेला सै.शकील सै.युसूफ हा बुलढाणा शहरातील रहिवासी असून, तो आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर शहरात चोरीच्या उद्देशाने सतत फिरत असे. तो अट्टल चोरीच्या सवईचा असल्याने याआधीही त्यांने कारागृहात अनेक वर्ष मुक्काम ठोकलेला आहे. तर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो स्वत:ची ओळख लपविण्यात पटाईत होता.