लिपिकाला लुटणाऱ्या अट्टल तडीपार टोळीप्रमुखाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By प्रदीप भाकरे | Published: February 23, 2024 07:49 PM2024-02-23T19:49:12+5:302024-02-23T19:49:21+5:30

या प्रकरणाचा मास्टरमाईंड प्रशांत राठी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

Attal Tadipar gang chief arrested for robbing clerk, Crime Branch Unit Two action | लिपिकाला लुटणाऱ्या अट्टल तडीपार टोळीप्रमुखाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

लिपिकाला लुटणाऱ्या अट्टल तडीपार टोळीप्रमुखाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती: पंचायत समितीतील शिक्षण विभागात कार्यरत लिपिकाला ओलीस ठेवून त्याच्याकडून रक्कम लुटण्याच्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. बबलु उर्फ नितीन भगवंत गाडे (३९, रा. यशोदा नगर) असे अटक आरोपीचे नाव असून, तो तडीपार देखील आहे. त्याला २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा मास्टरमाईंड प्रशांत राठी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

लिपिक पुंडलिक जाधव यांनी याबाबत १६ फेब्रुवारी रोजी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रशांत राठी, अतुल पुरी, बबलु गाडे व इतर अनोळखी चार इसमांनी मिळून आपल्याला महादेव खोरी परिसरातील एका बंद घरामध्ये नेले. तेथे नोकरी लावण्याकरीता झालेल्या आर्थिक व्यवहारातुन आरोपींनी चाकु, तलवारीचा धाक दाखवून आपल्याला ठार मारून टाकतो, अशी धमकी दिली. मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून बळजबरीने ४२०० रुपये काढून घेतल्याची तक्रार जाधव यांनी नोंदविली. त्यावरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणात अतुल पुरी या आरोपीला आधीच अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपी फरार झाले होते. मात्र प्रशांत राठी अद्यापही सापडलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी शहरातील एक नामांकित शिक्षणसंस्था देखील चौकशीच्या घेऱ्यात आली आहे.

महादेव खोरीतून सशस्त्र पकडले
कुख्यात फरार आरोपी व टोळी प्रमुख बबलू गाडे हा महादेव खोरी परिसरात सशस्त्र फिरत असल्याची माहिती गुन्हेशाखा युनिट दोनला मिळाली. तेथून साथीदारासह पळ काढताना पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पाठलाग करून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून खंजिर व चाकू जप्त करण्यात आला. बबलु गाडे हा तडीपार असल्याने त्याच्याविरूद्ध तडीपारीच्या उल्लंघनासह शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला दरोड्याच्या गुन्हयात अटक करण्यात आली. गुन्हे शाखाप्रमुख सिमा दाताळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरिक्षक महेश इंगोले, उपनिरिक्षक संजय वानखडे यांच्यासह अंमलदारांनी ही कारवाई केली.

टोळीप्रमुख गाडेच्या अटकेसाठी गुन्हेशाखा युनिट दोनने सहा दिवसांपासून त्या टोळीमधील ३० ते ४० सदस्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे त्याला अटक करणे शक्य झाले. यात संबंधित शिक्षणसंस्थेची देखील चौकशी होत आहे.
- कल्पना बारवकर, पोलीस उपायुक्त
 

Web Title: Attal Tadipar gang chief arrested for robbing clerk, Crime Branch Unit Two action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.