दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरांना अटक; ७७ लाख किमतीचे १११ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 09:09 AM2024-02-08T09:09:29+5:302024-02-08T09:09:41+5:30
विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली दुचाकीवाहन चोरी
नागपूर पोलिसांनी अश्या एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे, ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीचं नाही तर अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत. या चोरट्याचे वय वर्ष अवघे २४ वर्ष मात्र त्याने दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूर पर्यत मजल मारली आहे. परंतु म्हणतात ना आरोपी कितीही शातीर असू द्या एक ना एक दिवस तो पकडला जातोचं. तसंच काहीसं या चोरट्याचे झाले आहे. ललित गजेंद्र भोगे असं या महा-चोरट्याचे नाव आहे. त्याने अवघ्या दोन वर्षात ७७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १११ दुचाकी चोरण्याचा विश्व विक्रमचं केला आहे.
विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली दुचाकीवाहन चोरी-
आरोपीने नागपूर शहर ग्रामीण सह विदर्भातील अमरावती,चंद्रपूर,यवतमाळ,वर्धा,अकोला, भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर टिचून या पठ्याने तब्बल १११ दुचाकी चोरल्या आणि त्यांची परस्पर विक्री सुद्धा केली आहे. मात्र,एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंगचं फुटलं. नागपूर पोलिसांनी आतापर्यंत १११ दुचाकी जप्त केल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एकट्याने चोरल्या १११ दुचाकी-
वाहन चोरीच्या या कामात आरोपी ललित हा कुणाची मदत घेत नसे,त्याने एकट्याने एवढ्या साऱ्या गाड्या चोरल्या आहे अशी माहिती आता पर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.
पोलिसांनी २५० कॅमे-यांची केली पाहणी-
वाहन चोर आरोपी ललित याने गेल्या महिन्यात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दतील एक दुचाकी चोरली होती. दुचाकी मालकाने संदर्भात वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे सुरू केला. पोलिसांनी ज्या भागातून तांत्रीक विश्लेषन करून एकूण २५० कॅमे-यांची पाहणी केली.
फिल्मी स्टाईल आरोपीपर्यत पोहचले पोलीस--
गोपनीय माहीतीच्या आधारे तसेच वाहनचोरी तपास पथकाने नागपूर शहरातील वाहनचोरीचे हॉटस्पॉटची ओळख पटवली होती. त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं. सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करुन त्यामध्ये दिसत असलेल्या आरोपीचा हा वाडी मार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या मार्गावरील असलेल्या खाजगी कॅमेरांची पाहणी केली असता सदर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत असलेला इसम हा कोंढाळी भागातील असल्याचे गोपनीय माहीतीद्वारे निष्पन्न झाले. कोंढाळी येथे जावुन आरोपीचा शोध घेतला तो तिथं मिळुन आला.
आरोपीच्या घरातून मिळाल्या २० दुचाकी-
वाहन चोर आरोपी ललितने वाडी पोलीस ठाणे हद्दीतुन चोरलेली ती दुचाकी गाडी आरोपीकडे मिळुन आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याच्या घराच्या परिसरातुन एकुण २० चोरीचे वाहने आढळून आले. वाडी पोलिसांनी आरोपी ललितला अटक केली. तपासादरम्याण एकुण ९१ चोरीचे वाहने जप्त केले. अशाप्रकारे एकुण १११ चोरीचे वाहने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ७७ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. आरोपीने महाराष्ट्रातील एकूण ९ जिल्हात वाहनचोरी केल्याचं उघडकीस आले आहे.