नागपुरात क्षुल्लक कारणावरून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:32 PM2020-03-16T23:32:17+5:302020-03-16T23:32:59+5:30
बहिणीकडून परत आलेल्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून एका कुख्यात गुन्हेगाराने हत्या करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहिणीकडून परत आलेल्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून एका कुख्यात गुन्हेगाराने हत्या करण्याचा प्रयत्न केला. गळ्यावर चाकू मारल्यामुळे शुभम अशोक मेश्राम (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. अभय अजय हजारे असे आरोपीचे नाव आहे. तो पाचपावलीतील रहिवासी असून, तो कुख्यात गुन्हेगार आहे.
शुभम अशोक मेश्राम हा सुभाषनगरातील कामगार कॉलनीत राहतो तर, त्याचा भाऊ तेजस अशोक मेश्राम (वय १७) हा महालमध्ये राहतो. हे दोघे रविवारी बहिणीकडे गेले होते. तिकडून परत आल्यानंतर ते शुभमच्या घरी जात होते. प्रतापनगरातील बिग बाजाराच्या मागे संत तुकडोजीनगर आहे. तेथून जाणाऱ्या गल्लीत काही जण बाकड्यावर बसून होते तर काही जण उभे होते. त्यामुळे रस्ता निमुळता झाला होता. गाडी काढण्यास अडचण होत असल्याने शुभमने त्यांना उद्देशून रस्ता सोडून उभे राहा असे म्हटले. एवढ्या एका क्षुल्लक कारणावरून आरोपी अभय हजारेने शिवीगाळ केली आणि जवळचा चाकू काढून शुभम मेश्रामच्या गळ्यावर मारला. ध्यानीमनी नसताना हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. शुभमला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. माहिती कळताच प्रतापनगर पोलीस पोहचले. त्यांनी शुभमचा भाऊ तेजस याची तक्रार नोंदवून घेत आरोपी हजारेचा शोध सुरू केला.
कुख्यात हजारेची डावबाजी
आरोपी अभय हजारे हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसोबत संगनमत करून दोन महिन्यांपूर्वी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची पाठलाग करून एका सावजी हॉटेलमध्ये भीषण हत्या केली होती. तेव्हापासून तो या गुन्ह्यात फरार होता. पोलिसांच्या लेखी वॉन्टेड असलेला हा खतरनाक गुन्हेगार एमआयडीसी, प्रतापनगरात बिनधास्त फिरून मजा मारत होता. त्याने अगदीच क्षुल्लक कारणावरून मेश्रामवर चाकूहल्ला चढवला. प्रतापनगर पोलीस मागे लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांसोबत डावबाजी केली. तेथील अटक आणि पीसीआर चुकविण्यासाठी सरळ यशोधरानगर पोलीस ठाण्यात जाऊन जुन्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करवून घेतली. यावरून तो खतरनाकच नाही तर धूर्तही असल्याचे स्पष्ट झाले आहे.