'गिफ्ट' डिलिव्हरीच्या बहाण्याने डॉक्टरच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला; शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 08:22 PM2021-04-16T20:22:20+5:302021-04-16T20:25:36+5:30
Crime News : तिघांना जोगेश्वरी पोलिसांकडून अटक
मुंबई - लॉकडाऊनमध्ये 'ब्रेक दि चेन'ला सहकार्य करत नागरिक जीवनावश्यक वस्तू पार्सल मागवत आहेत. याचाच फायदा चोरांकडून घेत डिलिव्हरी बॉयच्या वेशात इमारतीत प्रवेश करून लुबाडणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच एक पफिल्मी थरार बुधवारी सकाळी जोगेश्वरीतील नागरिकांनी अनुभवला. ज्यात चोरांनी गिफ्ट डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टरच्या पत्नीला जखमी केले. मात्र शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला व आरोपी देखील गजाआड झाले.
जोगेश्वरी पूर्व इथल्या सॅटेलाईट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत १५ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास 'गिफ्ट' देण्याचा बहाणा करत दोन इसम तोंडाला कपडा बांधून शिरले. नेमके त्याच वेळी इमारतीचा सुरक्षारक्षक तिथे नसल्याने रजिस्टरमध्ये नोंद न करता ते थेट सी विंग मधील सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टर राजेशकुमार यादव यांच्या फ्लॅटसमोर उभे राहिले. त्यावेळी घरात फक्त डॉक्टरांची पत्नी सुशीला (४१) या होत्या. त्यांना पार्सल स्वीकारल्याच्या पावतीवर सही करायला सांगत अचानक या चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवण्यास सुरुवात केली. सुशीला या चाकूचा वार चुकवण्यासाठी जमिनीवर बसल्या आणि जोरजोरात ओरडू लागल्या. या प्रयत्नात त्यांच्या हाताला चाकू लागला व त्या जखमी झाल्या. मात्र त्याच वेळी त्यांच्या शेजारी राहणारे नागेश बुर्ला बाहेर आले.
प्रसंगावधान साधत चोरट्यांच्या हातातला चाकू त्यांनी हिसकावला आणि मोठमोठ्या आवाजात आरडाओरडा करून सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला आणि इतर रहिवाशांना सावध केले. त्यादरम्यान दोन चोर हे पार्किंगमधल्या छोट्या भिंतीवरून उड्या टाकत फाटकाबाहेर पळाले तर तिसरा चोरदेखील बाहेर पडला. मात्र इमारतीच्या सुरक्षारक्षकाने सुमारे दोनशे मीटरपर्यंत त्यांचा पाठलाग करून विक्रम यादव (३३) याला पकडले. जो डॉक्टर यादव यांच्या दवाखान्या जवळील मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो. तर त्याच्या चौकशीमध्ये राजेश गुज्जू यादव व अजय राजेंद्र यादव यांचीही नावे समोर आल्याने त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. बुर्ला यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुशीला यांचे प्राण वाचवले. त्यामुळे सोसायटीतील सदस्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.