तरुणाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, एक संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 03:41 PM2021-12-17T15:41:35+5:302021-12-18T11:13:55+5:30
Crime News: प्रशांत संजय भिसे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी सकाळी दानोळी-कोथळी मार्गावरील मंगोबा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.
जयसिंगपूर / दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील बेपत्ता असलेल्या त्या युवकाचा खून झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पैशाच्या देवाणघेवाणीतून प्रशांत संजय भिसे (वय २८) या तरुणाचा मित्रांनीच धारदार हत्याराने खून करुन मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी दानोळी-कोथळी मार्गावरील मंगोबा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रशांतचा मृतदेह मिळून आला.
दरम्यान, खूनप्रकरणी प्रताप ऊर्फ गुंड्या संजय माने (रा. दानोळी) याला अटक करण्यात आली असून अमोल ऊर्फ दाद्या दत्ता हराळे व सागर अजित होगले या दोघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. खुनाच्या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रशांत भिसे हा १५ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घरातून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने त्याचा शोध सुरु होता. गुरुवारी तो बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलिसांत देण्यात आली होती. दरम्यान, दानोळी येथील खर्डेकर सरकार यांच्या विहीरीत प्रशांतची मोटरसायकल आढळून आली होती. मात्र, त्याचा पत्ता लागला नव्हता.
शुक्रवारी सकाळी कोथळी येथील मंगोबा देवालयाजवळील रस्त्यालगत त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळून आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस पथकाने पाहणी केली. मृत प्रशांत याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
संशयित आरोपींनी प्रशांतचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. याठिकाणीच संशयिताचा डाव फसला.
मित्रांनीच केला घातपात
बुधवारी रात्री पार्टी करण्याच्या उद्देशाने प्रशांतला घेऊन संशयित आरोपी गेले होते. सर्वांनीच मद्यप्राशन केल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संशयित व प्रशांत यांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाला. त्यातूनच संशयितांनी धारदार हत्यारांनी मित्र प्रशांतचा घातपात केला, अशी तक्रार सुशांत भिसे यांनी पोलिसांत दिली आहे.