गंगाखेड येथे विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न; सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:45 PM2018-09-10T17:45:37+5:302018-09-10T17:47:36+5:30
पैसे आणण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली.
गंगाखेड (परभणी ) : घर बांधकाम व दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना रावराजुर ता. पालम येथे घडली असून याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावराजुर येथील सारिका (२५) यांचा विवाह २०१४ साली मारोती उराडे यांच्यासोबत झाला होता. लग्नाचे काही दिवस चांगले नांदविल्यानंतर घर बांधकामासाठी व दुचाकी घेण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी सारीकावर सासरची मंडळी दबाव आणत. यातूनच पती मारोती उराडे, सासु लक्ष्मीबाई उराडे, सासरा धारोबा उराडे, नणंद मिरा उराडे व तुळसा उराडे यांनी सतत शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सारिकाने माहेरी ( शिर्शी खु., रेणकापुर ता.परभणी ) भाऊ व आईला माहिती दिली. तसेच गंगाखेड पोलीस ठाण्यातील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल केली.
यानंतर पोलिसांनी सासर व माहेरकडील नातेवाईकांना घेऊन समेट घडवून आणला. मात्र, रविवारी (दि. ९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास पती, सासु, सासरा व दोन्ही नणंद यांनी मिळून सारिकाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यात गंभीररीत्या जळलेल्या सारिकावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या जबाबावरून रविवारी रात्री वरील पाच ही जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि राजेश राठोड व पोशि ओम वाघ करत आहेत.