कोट्यवधीच्या जमिनीवर नगरसेवकाचा सिनेस्टाईल कब्जा मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 11:33 PM2021-12-05T23:33:59+5:302021-12-05T23:34:25+5:30

सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण - प्रचंड तोडफोड, धमकी अन् शिवीगाळ - गिट्टीखदानमध्ये प्रचंड तणाव

Attempt by the corporator to capture the cinestyle of crores of land Nagpur | कोट्यवधीच्या जमिनीवर नगरसेवकाचा सिनेस्टाईल कब्जा मारण्याचा प्रयत्न

कोट्यवधीच्या जमिनीवर नगरसेवकाचा सिनेस्टाईल कब्जा मारण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नगरसेवक कमलेश चाैधरी आणि त्यांच्या ३० ते ४० गुंडांनी हजारीपहाडमधील कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. विरोध करणाऱ्या तेथील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. रविवारी दुपारी १२. ४० ते २. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

प्रकाश खुपचंद जैन (वय ७३, रा. धंतोली) हे व्यावसायिक आहेत. त्यांनी १९९० ला जैन यांनी गिट्टीखदानमधी हजारी पहाड भागात गेंदलाल खडगी आणि रामभाऊ खडगी यांच्याकडून जमिन विकत घेतली होती. पोलिसांकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, तेव्हापासुन त्या जमिनीवर जैन यांचा ताबा आहे. त्यांनी लाखो रुपये खर्ची घालून सभोवताल वॉल कंपाउंड बांधले असून चारही बाजुला गेट लावले आहे. तेथे नेहमी सुरक्षा रक्षकही तैनात असतात. गेल्या काही दिवसांपासून या जमिनीवर काही समाजकंटकांची नजर गेली आहे. जैन यांची ही जमिन हडपण्यासाठी काही भूमाफियांनी वेगवेगळी डावबाजीही केली आहे. मात्र, कागदपत्रे भक्कम असल्याने त्यांचा हा डाव वेळोवेळी उधळला गेल्याने काही समाजकंटक धमक्या देऊन ही जमिन हडपण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर, रविवारी १२.४० च्या सुमारास अभिजीत समर्थ नामक सुरक्षा रक्षकाने फोन करून जैन यांना माहिती दिली की आरोपी कमलेश चाैधरी (वय ३५), राहुल कानफाडे, दत्ता खोडे (वय ३४), बबलू ठाकूर (वय ३५), राजू माटे आणि सारिका चाैहान (रा. सर्व फ्रेण्डस कॉलनी, गिट्टीखदान) त्यांच्या ३० ते ४० साथीदारांसह येऊन तेथे दंगा करत आहेत.

त्यांनी चारही बाजुच्या वॉल कंपाऊंडचे गेट तोडून जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न चालविल्याचेही समर्थने जैन यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी आपल्या काही नातेवाईक तसेच सहकाऱ्यांना तेथे पाठवून पोलिसांना फोन केला. दरम्यान, धनंजय चोपडे याने आरोपींच्या गुंडगिरीची मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावर दंड्याने हल्ला चढवुन त्याला गंभीर जखमी केले. तोडफोड, आरडाओरड, शिवीगाळ अन् सिनेस्टाईल कब्जा मारण्याच्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दुपारी २. ३० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर गिट्टीखदान पोलीस तेथे पोहचले. त्यांनी जैन यांचे सुरक्षा रक्षक, कर्मचारी तसेच कब्जा करण्याचा प्रयत्न करणारे कमलेश चाैधरी आणि साथीदारांपैकी काहींना ठाण्यात नेले. तेथे वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 

संतप्त प्रतिक्रिया
अशा प्रकारे दिवसाढवळ्या कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा मारण्याचा प्रयत्न होण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांचा गुंडांना धाक उरला नसल्याचे यातून स्पष्ट होते, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून ऊमटली आहे.

Web Title: Attempt by the corporator to capture the cinestyle of crores of land Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर