नाशकात भर रस्त्यात पादचारी युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघे गुंड पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:08 AM2022-01-10T00:08:15+5:302022-01-10T00:08:39+5:30
पंचवटीतील पेठफाट्यावरून पायी जाणाऱ्या एका २१वर्षीय युवतीचा दुचाकीने पाठलाग करत बळजबरीने तिचा हात धरत ओढून दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा गुंडांचा डाव युवतीने आरडाओरड केल्याने उधळला गेला.
नाशिक :
पंचवटीतील पेठफाट्यावरून पायी जाणाऱ्या एका २१वर्षीय युवतीचा दुचाकीने पाठलाग करत बळजबरीने तिचा हात धरत ओढून दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा गुंडांचा डाव युवतीने आरडाओरड केल्याने उधळला गेला. आपल्या पुतनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या काकांनी धाव घेत गुंडांच्या तावडीतून तरुणीची सुटका केली. ही घटना रविवारी रात्री (दि.९) पंचवटीतील पेठ फाटा परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, हनुमानवाडी परिसरात राहणारी एक युवती पेठफाटा येथून पायी जात असताना संशयित राम दत्तू सांगळे व इंद्रकुड जाजूवाडीत राहणारा ललित एकनाथ मल्ले यांनी दुचाकीवरून येत युवतीचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी त्यांनी फिर्यादि युवतीला काहीतरी उद्देशून इशारे केले;मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष करुन पायी चालणे सुरूच ठेवले असता त्यातील एका संशयिताने युवतीचा हात पकडून तिला ओढत जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युवतीने आरडाओरड केली असता तिच्या काकांनी तत्काळ तिच्या दिशेने धाव घेतली. झटापट करत छेड काढणाऱ्या दोघांना पकडले आणि त्यांच्या तावडीतून युवतीला सोडविले. त्यावेळी त्यांनी तिच्या काकांना शिवीगाळ करून 'पोलिस ठाण्यात घेऊन गेले तर बघून घेऊ' असा दम भरला. त्यानंतर पीडित मुलीच्या काकांनी एका संशयित गुंडाला आवळून पकडून ठेवले तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला.
नागरिकांनी पोलिसांना माहिती काळविताच घटनास्थळी पोलीस पोहचले आणि त्यांनी एका संशयितास ताब्यात घेत वाहनात डांबले. त्याच्या फरार साथीदारासदेखील रात्री ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात पीडित युवतीने तक्रार अर्ज दिला आहे