पैशांसाठी विवाहितेला पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:04 IST2020-05-23T12:59:59+5:302020-05-23T13:04:03+5:30
विवाहित महिला तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

पैशांसाठी विवाहितेला पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : चार लाख रुपये माहेरून घेऊन येण्यास सांगून सासरच्यांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच ती झोपेत असताना तिला पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. इंद्रायणीनगर, भोसरी येथे २४ नोव्हेंबर २०१९ रोजी हा प्रकार घडला.
याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अशोक लक्ष्मण धवडे, सासू हिराबाई लक्ष्मण धवडे, सासरा लक्ष्मण आसाराव धवडे, मावस दीर पप्पू नारायण धवडे, एकनाथ लक्ष्मण धवडे, जाऊ उषाबाई एकनाथ धवडे, तसेच शांताबाई दगडू वापसे (सर्व रा. सेक्टर ७, एमआयडीसी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहित महिला तिच्या सासरी नांदत असताना आरोपी यांनी संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. माहेरून चार लाख रुपये घेऊन ये, असे त्यांनी सांगितले. आताच माझ्या वडिलांनी चार लाख रुपये दिले आहेत, असे फिर्यादी म्हणाल्या. त्यामुळे आरोपी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादी झोपल्या असताना आरोपी यांनी त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान विवाहित महिलेने जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार गोंदी पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.