कर्तव्यावर असलेल्या पोलीसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 09:17 PM2019-11-18T21:17:10+5:302019-11-18T21:19:40+5:30
वाहतूक नियमाचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मीरारोड - चुकीच्या मार्गाने येणारी चारचाकी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीसावरच चालकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री काशिमीरा नाका येथे घडली आहे. सुदैवाने वाहतूक पोलीस बचावला असून आज सोमवारी पोलीसांनी सदर गाडी चालकावर केवळ वाहतूक नियमाचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी अमित बोकारे (३३ ) हे रविवारी रात्री काशिमीरा नाक्याजवळ कर्तव्यावर तैनात होते. त्यावेळी पालिका बसडेपोकडून काशिमीरा नाका दिशेने विरुध्द मार्गावरुन पांढऱ्या रंगाची हुंडाई एसेंट (एमएच ०२ ईएच ४२४९) ही वेगाने येत होती. बोकारे यांनी नाईट मिटींग बारच्या बाहेरील रस्त्यावर ही चाचाकी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. बोकारे वेळीच सावध झाल्याने बचावले.
गाडी चालक मात्र पसार झाल्याने पोलीसांनी त्याचा शोध सुरु केला. ती गाडी सिल्वर पार्क भागात एका गॅरेजजवळ उभी केलेली पोलीसांना आढळल्यावर तिला पोलीसांनी जॅमर लावला. आज सोमवारी सकाळी गाडीचा मालक हा गाडी चालक सलमान खान (३१) सह काशिमीरा वाहतूक शाखेत हजर झाल्यानंतर पोलीसांनी सलमानविरुध्द चुकीच्या दिशेने तसेच बेशिस्त वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे याप्रकरणी वाहतूक कायद्यानुसार दंड आकारणी केली असल्याचे वाहतूक पोलिसांकडुन सांगण्यात आले.
परंतु पोलीसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे काही पोलीसांनीच खाजगीत बोलुन दाखवत घटनेचा निषेध केला. या आधी वर्षभरापूर्वी वरसावे नाका येथे फाऊंटन हॉटेलजवळ वाहतूक पोलीस कर्मचारी मंगेश देशमुख यांना वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. दिड महिना उपचारासाठी रजेवर होते. त्या प्रकरणात काशिमीरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.