बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न; रिया चक्रवर्तीच्या वकिलाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 09:29 PM2020-09-26T21:29:48+5:302020-09-26T21:30:05+5:30
सुशांतच्या व्हिसेरा तपासणी प्रकरणी सीबीआयने स्वतंत्र मेडिकल बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली आहे.
मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अभिनेत्री आणि या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिचे वकील अॅड. सतीश माने-शिंदे यांनी केला आहे. आधीच ठरवून दिलेले निष्कर्ष लादण्याचा प्रयत्न केला जात असून, सुशांतच्या व्हिसेरा तपासणी प्रकरणी सीबीआयने स्वतंत्र मेडिकल बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली आहे.
शुक्रवारी सुशांतच्या वडिलाचे वकील विकास सिंग यांनी पत्रकारांना पंचनाम्यातील एक फोटो दाखवित त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे 200 टक्के दिसत आहे', फॉरेन्सिक तपासणी करणाऱ्या एम्स रुग्णालयाच्या पथकातील एका डॉक्टरच्या हवाल्याने त्यांनी हे वक्तव्य केलं होते. मात्र त्यांच्या दाव्याचा एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. गुप्ता यांनी तातडीने फेटाळून लावला होता. त्यानुषंगाने ऍड. माने -शिंदे यांनी म्हटले आहे की,
'केवळ फोटोंवरून विश्लेषण करून मत मांडण्याची ही पद्धत अत्यंत घातक आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे भांडवल केले जात आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश करणे हे त्याचेच द्योतक आहे, या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हायला हवा. त्यासाठी सीबीआयनं स्वतंत्र मेडिकल बोर्ड स्थापन करण्याची गरज आहे.