विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 07:10 AM2021-12-25T07:10:30+5:302021-12-25T07:11:09+5:30
महिलेला वेळीच ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानभवनाबाहेर गुरुवारी बीकेसीतील व्यक्तीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची घटना ताजी असतानाच, शुक्रवारीदेखील विधानभवनाबाहेर एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथील पोलिसांनी महिलेला वेळीच ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले.
दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राजलक्ष्मी पिल्ले असे या महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या नाशिकच्या असून, युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे पती मधुसूदन पिल्ले यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी गणेश पाटील यांच्या फॅक्टरीचे बांधकाम केले होते. काही रक्कम त्यांना दिली होती. मात्र, रक्कम परत न करता, पाटील यांनी पिल्ले यांना धमकी दिली. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात याची तक्रार केली होती. त्याची दखल न घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
राजलक्ष्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिल्ले दाम्पत्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. जिवे मारण्याची धमकी दिली. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी राजलक्ष्मी यांचे समुपदेशन करीत त्यांना कुटुंबीयाच्या ताब्यात दिले.