पोलिसांचा खबरी म्हणून अपहरण करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न
By मनीषा म्हात्रे | Published: July 14, 2022 09:43 PM2022-07-14T21:43:32+5:302022-07-14T21:44:17+5:30
Crime News : गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणारा जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : गुटख्याच्या बेकायदेशीर विक्रीबाबत पोलिसांना माहिती देत असल्याच्या रागात ३२ वर्षीय तरुणाचे अपहरण करत त्याला लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने मारहाण करणाऱ्या त्रिकूटाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहे. राजेश शेट्टीयारसह तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
ताडदेव परिसरात राहणारा ३२ वर्षीय तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला होता. तरुणाच्या तक्रारीनुसार, गेल्या ५ ते ६ वर्षांपासून तो राजेश शेट्टीयार आणि तानाजी खोपडे (३५) याला ओळखतो. राजेश हा गुटखा पुरवठादार असून तानाजी त्याच्यासाठी काम करतो. त्यांच्या गुटखा विक्रीबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या रागात तानाजीने त्याला बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. ७ मे रोजी तक्रारदार तरुण दुचाकीवरून विक्रोळी येथे आला असताना सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास कारमधून आलेल्या तानाजीने त्याला अडवले. लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने त्याच्यावर हल्ला चढवला. पूढे, कारमधून शिवडी फाटक येथील गोडावून मध्ये नेले. तेथे पोलीस खबरी म्हणून करत असलेल्या कामाबाबत चौकशी केली. त्याने, प्रतिसाद न देताच पुन्हा मारहाण केली. यामध्ये तरुणाची प्रकृती खालावताच तानाजीने त्याला जवळच्या रुग्णालयात सोडले. तेथे त्याला फ्रॅक्चर झाल्याचे समजले. उपचार घेतल्यानंतर त्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.
पुढील तपासासाठी हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ५ कडे वर्ग केला. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण ) बालसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त नामदेव शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनीता भोर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. यामध्ये शेट्टीयारसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
छुप्या मार्गाने मुंबईसह महाराष्ट्रात गुटखा विक्री
शेट्टीयार त्याच्या साथीदारांसह छुप्या मार्गाने मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करत होता. तक्रारदारमुळे त्याच्यावर वेळोवेळी कारवाई करत त्याचा माल जप्त करण्यात आला. त्यामुळे त्याचे मोठ्या स्वरूपात आर्थिक नुकसान झाल्याच्या रागात तक्रारदाराला अद्दल घडविण्यासाठी त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.