‘त्या’अंगडियाकडूनच लाच देण्याचा प्रयत्न; सौरभ त्रिपाठीची पाेलीस अधिकाऱ्यांना माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:23 AM2022-03-24T09:23:35+5:302022-03-24T09:23:48+5:30
पेन ड्राईव्हमध्ये दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्पर केले असावे, असा संशय गुन्हे शाखेला आहे.
मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अंगडियाकडूनच कारवाई नको, यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्रिपाठी यांनी त्यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या प्राथमिक तपासादरम्यान एक ऑडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द केला होता. या पेन ड्राईव्हमध्ये दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्पर केले असावे, असा संशय गुन्हे शाखेला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगडियाकडून करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये त्रिपाठीने महिन्याला १० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान त्रिपाठी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सावंत यांच्यासमोर आपली बाजू मांडताना त्रिपाठी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी आपल्या बचावात एक ऑडिओ रेकॉर्डिंग सावंत यांना दिली.
ज्याद्वारे त्यांना अंगडियांचा गट आपल्याला भेटला होता. तसेच त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या अंगडिया व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, म्हणून दर महिन्याला लाच देण्याची ऑफर केल्याचे यातून दाखविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे, अंगडिया असोसिएशनकडूनदेखील एक ऑडिओ क्लिप पोलिसांना देण्यात आली आहे. यामध्ये त्रिपाठी अंगडियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यास सांगत आहेत. या प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन पोलीस अधिकाऱ्यांसह चारजणांना अटक केली आहे, तर त्रिपाठीचा शोध सुरू आहे.
ऑडिओ रेकॉर्डिंगची सत्यता तपासणार
त्रिपाठी यांनी दिलेली ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्परिंग केली असावी किंवा ती स्क्रिप्टनुसार बनविण्यात आली असावी, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. या आधारावर त्रिपाठी स्वतःचा बचाव करू शकतील. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार गुन्हे शाखा करत आहे. जेणेकरून या ऑडिओ रेकॉर्डिंगची सत्यता तपासता येईल. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.