आमदार वसंत खंडेलवाल यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, ऑटो चालकाची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2023 23:29 IST2023-05-21T23:27:54+5:302023-05-21T23:29:44+5:30
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत ऑटो चालकाचा शोध सुरू केला आहे.

आमदार वसंत खंडेलवाल यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, ऑटो चालकाची मनमानी
अकोला : एका ऑटो चालकाने आमदार वसंत खंडेलवाल यांच्याशी हुज्जत घालत त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. या संदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार खंडेलवाल हे रात्री आपल्या प्रतिष्ठानातून खंडेलवाल भवन येथील निवासस्थानी जात होते. या मार्गावरील कोपऱ्यावर एक ऑटोचालक आडवी ऑटो लावून उभा होता.
गाडीचा हॉर्न वाजवूनही ऑटो चालकाने ऑटो बाजुला केली नाही म्हणून आ. खंडेलवाल हे खाली उतरले, त्याला याबाबत विचारणा करू लागले असता त्यांनी हुज्जत घातली. हा प्रकार खटकल्याने खंडेलवाल यांनी मोबाईलद्वारे ऑटो चालकाचा फोटो काढला असता चालकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकला व ऑटोसोबत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान मोबाईल खाली पडला मोबाईल उचले पर्यंत ऑटोचालक पळून गेला.
या संदर्भात आमदार खंडेलवाल यांना विचारणा केली असता हा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ऑटोचालकांची वाढलेली हिंमत पाहता पोलिसांचा काही धाक उरलेला नाही हेच समोर येते. माझ्या गाडीत सराफा पेढीची रोख रक्कम सुद्धा होती. त्यामुळे हा प्रकार गांभिर्याने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत ऑटो चालकाचा शोध सुरू केला आहे.