वाकड येथे वर्गणी न दिल्याने व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 02:01 PM2019-09-06T14:01:34+5:302019-09-06T14:03:29+5:30
गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी का देत नाही, अशी विचारणा आरोपीने केली.
पिंपरी : गणपती मंडळाची वर्गणी का देत नाही, असे म्हणून व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी पहार घातली. यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. तसेच व्यावसायिकाच्या आईला व भावालाही मारहाण केली. वाकड येथे गुरुवारी (दि. ५) हा प्रकार घडला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश देवराम चौधरी असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश यांचे भाऊ रमेश देवराम चौधरी (वय ३७, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर घडसिंग (रा. वाकड) व त्याचे आठ ते दहा साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रमेश चौधरी यांचे वाकड येथील म्हातोबानगरमध्ये कपड्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्री चौधरी यांनी दुकान बंद केले. त्यानंतर आरोपी सागर घडसिंग याने त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह दुकानाची जाळी जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी का देत नाही, अशी विचारणा आरोपीने केली. जाळी वाजवू नको, असे म्हणत मुकेश चौधरी व त्यांची आई जमनीबाई चौधरी यांनी आरोपी घडसिंग याला विरोध केला. तुम्ही आम्हाला देणगी का देत नाही, थांब तुला आता खल्लास करतो, असे म्हणून आरोपी घडसिंग याने लोखंडी पहार मुकेश चौधरी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या साथीदारांनी फियार्दी रमेश आणि त्यांची जमनीबाई चौधरी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.