५३ अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 06:56 PM2019-02-25T18:56:23+5:302019-02-25T19:00:26+5:30
नुकतीच त्यानं एका अमेरिकन नागरिकाला ३८ लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.
मुंबई - कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली आहे. तौफीक शेख असं अटक आरोपीचं नाव आहे. नुकतीच त्यानं एका अमेरिकन नागरिकाला ३८ लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.
दहिसर परिसरात राहणारा आरोपी तौफीक शेख आणि त्याचे साथीदार हे अमेरिकेतील नागरिकांना जास्तीत जास्त लक्ष्य करून त्यांची फसवणूक करायचे. कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्यानं अमेरिकेतील नागरिकांचे कॉम्प्युटर हॅक केले होते. त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये वायरस असल्याचं सांगून त्यांच्याकडून डॉलर स्वरुपात पैसे उकळायचे. मागील अनेक महिन्यांपासून कॉल सेंटरच्या नावाखाली ही टोळी गोरखधंदा करत होती. या टोळीनं अलीकडेच अमेरिकेतील नागरीकांची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॉल सेंटरचा पार्टनर असलेल्या तरुणाला अटक केली. अंधेरीतील कॉल सेंटरप्रकरणात आरोपीचा सहभाग पुढे आला आहे.
आरोपी तौफीक हा दहिसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक करण्यात आल्याचं सांगितलं. आरोपींनी ५३ अमेरिकन नागरीकांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपीना मिळालेले अमेरीकन डॉलर भारतीय चलनात रुपांतर केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वी याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.