राखीला पतीकडून मारहाणीचा प्रयत्न; दागिनेही घेतले, गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:00 AM2023-02-08T11:00:09+5:302023-02-08T11:00:35+5:30
राखीने आरोप केला आहे की, आदिलने तिचे पैसे आणि ४ लाख रुपये किमतीचे दागिने घेतले आणि तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : अभिनेत्री आणि माजी बिग बॉस स्पर्धक राखी सावंत हिने तिचा पती आदिल दुर्राणीवर केलेल्या गंभीर आरोपानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याचा जबाब नोंदवण्यात आला.
राखीने आरोप केला आहे की, आदिलने तिचे पैसे आणि ४ लाख रुपये किमतीचे दागिने घेतले आणि तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राखीने सोमवारी रात्री पती आदिलविरोधात एफआयआर दाखल केला. तिच्या आईला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले असते, तर आज ती जिवंत असती, असेही मीडियासमोर सांगत राखीने आदिलला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आदिलने मला रस्त्यावर आणले. मला लुटले, असेही ती म्हणाली. तिचे पैसे आणि आईचे दागिने घेऊन तिने घर सोडल्याचा आरोपही तिने केला.
बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तिने तिच्या आईला काही हवे असल्यास ते पुरविण्यासाठी आदिलला १० लाखांचा चेक दिला होता. मात्र, पैसे असूनही माझी आई हॉस्पिटलमध्ये असताना त्याने तिला खर्चासाठी पैसे दिले नाहीत, असेही तिचे म्हणणे आहे, तसेच त्याचे अन्य महिलेसोबत संबंध असल्याचाही तिचा आरोप आहे. राखीने या वर्षाच्या सुरुवातीला एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आदिल खानशी तिच्या लग्नाबद्दल खुलासा करताना सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यांचे लग्न २०२२ मध्ये झाले आणि तिने आदिलच्या सांगण्यावरून ते लग्न गुप्त ठेवले. राखी सावंतचे यापूर्वी रितेश राजसोबत लग्न झाले होते. दोघांनी बिग बॉस १५ मध्ये देखील भाग घेतला होता.
आम्ही आदिलची चौकशी करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर धनावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.