वरळीत खंडणीसाठी हत्येचा प्रयत्न; पेटवली कार, आरोपीला बेड्या
By मनीषा म्हात्रे | Published: November 8, 2023 02:33 PM2023-11-08T14:33:02+5:302023-11-08T14:34:19+5:30
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात १३ गुन्ह्यांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वरळीत गाडी पार्क करत असताना धक्का लागल्याचा बहाणा करत सराईत गुन्हेगाराने एका व्यावसायिकावर हल्ला चढवत हफ्त्याची मागणी केली. १० हजारांचा हफ्ता न दिल्याच्या रागात त्यांची कार पेटवली. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. वरळी परिसरात राहणारे नुरुद्दीन सलाउद्दीन शेख (३४) हे मेकॅनिक आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी नितीन ताटल्या रमाकांत भोसले (४२) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध १३ गुन्हे नोंद आहेत.
शेख यांच्या तक्रारीनुसार, ६ तारखेला सायंकाळी साडे चारच्या सुमारास वरळी बिडीडी चाळ परिसरात शेख हे कार पार्क करत असताना, ताटल्या तेथे आला. धक्का लागल्याचा बहाणा करत, तो वरळी पोलीस ठाणेच्या हदीतील मोठा भाई असून परीसरातील लोकांकडून हप्ता वसूल करत असल्याचे सांगितले. शेख यांना धमकावून १० हजार रुपयांचा हप्ता मागीतला. त्यांनी नकार देताच, हातातील कोयत्याने डोक्यात जीवे ठार मारण्याच्या उददेशाने हल्ला चढवला. शेख यांनी गाडीच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडून नागरिकांना मदतीसाठी आवाज देण्यास सुरुवात केली.
तोपर्यंत शेखने वाहनाची तोडफोड केली. तसेच, गाडीवर बाटलीतून काहीतरी शिपडून गाडी लायटरच्या सहाय्याने पेटवली. घटनेची वर्दी लागताच वरळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शेख यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी हत्येचा प्रयत्नासह खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे.