जिलेबीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून विक्रेत्याच्या खूनाचा प्रयत्न
By जितेंद्र कालेकर | Published: August 27, 2023 09:35 PM2023-08-27T21:35:41+5:302023-08-27T21:36:07+5:30
वजन काट्याने केला डोक्यावर प्रहार : उकळते तेल अंगावर पडल्याने गंभीर जखमी
ठाणे : जिलेबी खरेदी केल्यानंतर तिचे पैसे मागितल्याच्या रागातून राजेश यादव (३६, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याच्यावर सरवन (४५, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे ) याने वजन काट्याने डोक्यात जोरदार प्रहार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यात राजेश हातगाडीवरील उकळत्या तेलाच्या कढईवर पडल्याने गरम तेल अंगावर पडून तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून आराेपीचा शाेध घेण्यात येत असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली.
साठेनगर भागातील रहिवाशी राजेश यादव यांची ‘ममता स्वीट्स’ या दुकानासमोर जिलेबी विक्रीची हातगाडी राेज लावली जाते. २५ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९.१५ वाजता राजेश हा कढईमधील तेलामध्ये जिलेबी तयार करण्याचे काम करीत होता. त्यावेळी त्याच्या परिचयाच्या सरवन नामक व्यक्तीने त्याच्या हातगाडीवरील जिलेबी खाल्ली. परंतु, त्याचे पैसे न देताच तो निघू्न जाऊ लागला. त्यावेळी राजेशने त्याच्याकडे जिलेबीचे पैसे मागितले. पैसे देण्याऐवजी त्याने शिवीगाळ करून ताे निघून गेला. त्यानंतर पुन्हा रात्री ९.३० वाजता तो हातगाडीवर आला. तेव्हा जिलेबीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून राजेशला ठार मारण्याच्या उद्देशाने जवळच्याच अन्य एका हातगाडीवरील लोखंडी वजनमाप उचलून ते राजेशच्या डोक्यात मारले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या धुमश्चक्रीत तोल जाऊन तो हातगाडीवर उकळत्या तेलाच्या कढईवर पडला.
त्यावेळी कढईतील उकळते गरम तेल त्याच्या चेहऱ्यावर आणि अंगावर पडून ताे गंभीर जखमी झाला. राजेश यांना औषधोपचारासाठी नवी मुंबईच्या ऐरोलीतील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी सरवन याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांनी सांगितले.