मुंबईत फटाके फोडण्याच्या वादातून हत्येचा प्रयत्न
By मनीषा म्हात्रे | Published: November 16, 2023 04:39 PM2023-11-16T16:39:20+5:302023-11-16T16:39:38+5:30
भरडकर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात शिवराज धनगर (२१) जखमी झाला आहे.
मुंबई : घराबाहेर फटाके फोडण्याच्या वादातून अंधेरीत तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची घटना अंधेरीत घडली. याप्रकरणी डी. एन नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
अनिल अर्जुन भरडकर (४२), कोमल भरडकर (३०) या दाम्पत्यासह त्यांच्या लहान मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरडकर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात शिवराज धनगर (२१) जखमी झाला आहे. तो अंधेरीच्या जुहू गल्लीत राहण्यास आहे. पाडव्या निमित्ताने शिवराज हा लहान भावासोबत रात्रीच्या साडे नऊच्या सुमारास परिसरात फटाके फोडत असताना भरडकर कुटुंबियांसोबत त्याचा वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. भरडकर दाम्पत्यासह त्यांच्या लहान मुलाने चाकूने वार केले. स्थानिकांच्या मदतीने शिवराजला कूपर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शिवराजच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भरडकर दाम्पत्याला अटक केली आहे.
यापूर्वी गोवंडीत सोमवारी सकाळी जवळ फटाका फुटल्याचा रागात चौघांवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी निखिल भालेराव आणि निलेश भालेराव या दोघांना अटक केली.
फटाके देण्याचे आमिष दाखवत अत्याचार
अँटॉपहील परिसरात कुटुंबियांसोबत राहणारी ८ वर्षीय मुलगा सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्या मित्रासोबत येथील एका शाळेजवळ फटाके फोडत होता. आरोपी अंकुश महाडीक (३२) याची यातील एका मुलावर वाईट नजर पडली. त्याने या मुलाला फटाके घेऊन देण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत येथील एका इमारतीमध्ये नेले. तेथे महाडीक याने या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणाकडेही वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी देऊन महाडीक त्या मुलाला तेथेच सोडून पसार झाला. मुलाने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगताच त्यांनाही धक्का बसला. कुटुंबियांनी मुलाला सोबत घेऊन एन्टाॅप हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी पीडित मुलाच्या वडिलांची फिर्याद नोंदवून घेत भादंवि आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखळ करुन महाडीक याला अटक केली आहे. महाडीकविरोधात एन्टाॅपहील आणि माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.