चिखलीत १३ वाहनांची तोडफोड करून खुनाचा प्रयत्न, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 11:21 PM2020-12-24T23:21:36+5:302020-12-24T23:21:56+5:30
Crime News : नुरमहोम्मद ऊर्फ गुल्लू हमीद सय्यद (वय १८, रा. घरकुल, चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी : मीच घरकुलचा डॉन आहे, कोणी माझ्या नादी लागला तर त्याला खल्लास करीन, अशी धमकी देऊन दहशत पसरविली. तसेच कोयत्याने एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने १३ वाहनांची तोडफोड केली. चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. घरकुल चिखली येथे बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.
नुरमहोम्मद ऊर्फ गुल्लू हमीद सय्यद (वय १८, रा. घरकुल, चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश बालाजी गायकवाड (वय २९, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रात्री घरी असताना कोणीतरी आरडाओरडा करीत असल्याचे ऐकू आले. त्यामुळे फिर्यादी हे सोसायटीच्या इतर सभासदांसह बिल्डिंगच्या खाली आले. त्यावेळी आरोपी हा हातात कोयता घेऊन दहशत पसरवित होता. आता मीच घरकुलचा डॉन आहे, माझ्या नादी लागला तर त्याला खल्लास करीन, अशी धमकी दिली.
तसेच त्याने गाड्या फोडत होता. त्यामुळे फिर्यादी त्याला विचारायला गेले. त्यावेळी त्याने कोयता जोरात मारून फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहा दुचाकी तीन तीनचाकी आणि चार चारचाकी, अशी एकूण १३ वाहनांची तोडफोड करून ४४ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले. मोठमोठ्याने आरडाओरडा करून हातात कोयता घेऊन दहशत पसरवून आरोपी तेथून निघून गेला.