डहाणूत ज्वेलर्सवरील दरोड्याचा प्रयत्न फसला; दुकान मालकावर रोखले रिव्हॉल्व्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:49 AM2022-03-10T09:49:34+5:302022-03-10T09:49:44+5:30
डहाणू येथील सागरनाका रस्त्यावरील चंद्रिका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्श्व ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी दुपारी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोने खरेदीसाठी दुकान मालक प्रज्योत कर्नावट यास सोन्याची अंगठी, चेन, दाखविण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर परिषदेजवळच्या एका सोने-चांदीच्या दुकानावर बुधवारी भर दुपारी दोघा अनोळखी रिव्हॉल्व्हरधारी युवकांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश करून ज्वेलर्स मालकाचा हात पकडून रिव्हॉल्व्हर रोखले. परंतु, दुकान मालक प्रज्योत कर्नावट यांनी प्रसंगावधान राखून झटापट करून आरडाओरड केल्याने रस्त्यावरील लोक धावत येत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी तिथून पळ काढला.
डहाणू येथील सागरनाका रस्त्यावरील चंद्रिका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्श्व ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी दुपारी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोने खरेदीसाठी दुकान मालक प्रज्योत कर्नावट यास सोन्याची अंगठी, चेन, दाखविण्यास सांगितले. तीन लाखांचे सोने आम्हाला घ्यायचे आहे; परंतु तुमच्याकडे कार्ड स्विफ्ट करण्याचे मशीन आहे काय असे विचारले. तेव्हा दुकानदाराने नाही सांगितल्यावर आम्ही उद्या येतो असे सांगून दोन दरोडेखोर बुधवारी पुन्हा दुकानात आले. त्यांनी दागिने पुन्हा दाखविण्यासाठी सांगितले. यावेळी एका दरोडेखोरांनी दुकान मालक प्रज्योत यांचा हात पकडून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. परंतु, झटापट करून हात सोडवून मालकाने आरडाओरड केल्याने दुकानात बॅग टाकून दरोडेखोर मोटारसायकलवरून बाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरले. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी भेट दिली.