विनयभंगाची खोटी तक्रार केल्याने पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 09:11 PM2021-01-21T21:11:47+5:302021-01-21T21:12:18+5:30
Attempted self-immolation : आपल्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सदर व्यक्तीचे म्हणणे आहे.
नवी मुंबई - एका व्यक्तीने गुरुवारी सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सदर व्यक्तीचे म्हणणे आहे.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. घणसोली येथील एका व्यक्ती विरोधात एका महिलेने कोपर खैरणे पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. सदर व्यक्तीने आपला विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मात्र आपल्यावर झालेला आरोप खोटा असून राजकीय सूडबुद्धीने तो केला असल्याचे सदर व्यक्तीचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची देखील भेट घेतली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा सदर व्यक्तीचा आरोप आहे. त्यामुळे सदर व्यक्तीने गुरुवारी पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले आहे. मात्र सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झालेला नसून केवळ तक्रार अर्ज प्राप्त झाला असल्याचे कोपर खैरणे पोलिसांनी सांगितले.